कोल्हापूर सिटीला ‘वन स्टार’

दीपक कुपन्नावर
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

गडहिंग्लज - कोल्हापूरच्या फुटबॉल संघाला युवा आय लीग स्पर्धेत झळकविण्याची संधी मिळाली आहे. एफसी कोल्हापूर सिटीला वनस्टार मानांकन मिळाले आहे.

गडहिंग्लज - कोल्हापूरच्या फुटबॉल संघाला युवा आय लीग स्पर्धेत झळकविण्याची संधी मिळाली आहे. एफसी कोल्हापूर सिटीला वनस्टार मानांकन मिळाले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) युवा इंडियन लीगसाठी (आय लीग) इच्छुक संघांची छाननी केली. यात एफसी कोल्हापूर सिटी पात्र ठरला आहे. युवा आय लीगसाठी पात्र ठरलेला कोल्हापुरातील हा पहिलाच संघ आहे. दरम्यान, देशातील ८३ संघ तेरा, पंधरा व अठरा वर्षांखालील आय लीग स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

भारतीय फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी जागतिक फुटबॉल महासंघाच्या सूचनेनुसार एआयएफएफने फुटबॉल संघांसाठी निकष तयार केले आहेत. या निकषांची छाननी करून पात्र संघांना युवा आय लीग स्पर्धेसाठी संधी दिली जाते. या वर्षीच्या हंगामासाठी १०९ संघांनी एआयएफएफकडे अर्ज केले होते. या सर्व संघांची विशेष समितीने छाननी केली. त्यांतून ८३ पात्र संघांची यादी एआयएफएफने जाहीर केली.

पायाभूत निकष पूर्ण करणाऱ्या संघाला वन स्टार, त्याहून चांगल्या सुविधा असणाऱ्या संघाला टू स्टार तर उत्कृष्ट आणि सर्वोत्कृष्ट सुविधा असणाऱ्या संघांना थ्री स्टार आणि फोर स्टार असे मानांकन दिले आहे. 

यंदा प्रथमच अर्ज केलेल्या एफसी कोल्हापूर सिटीला वन स्टार मानांकन मिळाले आहे. उद्योजक चंद्रकांत जाधव आणि सहकाऱ्यांनी या संघाची उभारणी केली आहे.

सुखदेव पाटील, निखिल कदम, अनिकेत जाधव यांसारखे कोल्हापुरातील खेळाडू आय लीग आणि इंडियन सुपर लीगमध्ये चमकत असले; तरी कोल्हापुरात आय लीग संघ नसल्याची खंत होती. शतकाचा देदीप्यमान इतिहास आणि प्रतिभावान खेळाडूंची खाण असूनही, आय लीग संघ नसल्याने स्थानिक गुणवत्ता शाहू स्टेडियमपुरतीच घुटमळत असल्याची सल माजी खेळाडूंत होती. कोल्हापूर सिटी एफसी संघाच्या रूपाने अनेक वर्षांची मागणी फळाला येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंनाच घेऊन हा संघ बनवावा, अशीही स्थानिक फुटबॉल 
जाणकारांची अपेक्षा आहे.

दरम्यान, जेएसडब्लू बेंगलोर एफसी, बोका ज्युनिअर्स, वायचुंग भुतिया फुटबॉल स्कूल, रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्पस या संघांना सर्वोत्कृष्ट फोर स्टार मानांकन मिळाले आहे. १३ संघांनी थ्री स्टार, ४० संघांनी टू स्टार तर २६ संघांनी वन स्टार मानांकन मिळविले आहे.

हे आहेत निकष.. 

  •  एएफसी अ, ब, क, ड आणि ग्रासरूट प्रशिक्षक हवेत 
  •  गोलरक्षक आणि फिजिओथेरपिस्टसाठी अधिक गुण
  •  खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या वेतनाचे करार
  •  संघाचा स्वतःचा प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम 
  •  मैदान, कार्यालय, व्यायामशाळा स्वत:ची अथवा भाडेतत्त्वावर
Web Title: FC Kolhapur city gets one star rating