अतिक्रमणाच्या धाकाने प्रवेशद्वार उघडले

दौलत झावरे
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

जिल्हा परिषदेच्या संरक्षक भिंतीजवळ असलेली अतिक्रमणे दोनदा हटविण्यात आली, तरीही "जैसे थे'च स्थिती आहे; मात्र ही "अतिक्रमण हटाव' मोहीम राबविल्यामुळे जिल्हा परिषदेचे अनेक वर्षांपासून बंद असलेले प्रवेशद्वार उघडण्यात आले.

नगर ः जिल्हा परिषदेच्या संरक्षक भिंतीजवळ असलेली अतिक्रमणे दोनदा हटविण्यात आली, तरीही "जैसे थे'च स्थिती आहे; मात्र ही "अतिक्रमण हटाव' मोहीम राबविल्यामुळे जिल्हा परिषदेचे अनेक वर्षांपासून बंद असलेले प्रवेशद्वार उघडण्यात आले. तेथून आजपासून (सोमवार) वाहने बाहेर पडू लागली आहेत. 

जिल्हा परिषदेच्या संरक्षक भिंतीलगत सुमारे 40 जणांनी अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे येथे नेहमीच वाहतुक कोंडी होते. वाहनांना जाण्यासाठी रस्ताच शिल्लक रहात नाही. त्या मुळे अपघातही होता. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली होती. ही अतिक्रमणे हटवावीत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाला ती अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानंतर अतिक्रमणविरोधी विभागाने ती अतिक्रमणे दोनदा हटविली. त्याच वेळी प्रवेशद्वार क्रमांक दोन उघडे करण्यात यावे, या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर प्रवेशद्वार क्रमांक एकमधून चारचाकी वाहनांना प्रवेश देऊन दोनमधून बाहेर पडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर यावर कारवाई करण्यात आली. आज प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून वाहने बाहेर पडू लागली. 

पदाधिकाऱ्यांकडून कौतुक 

प्रवेशद्वार क्रमांक दोन वाहतुकीस खुले करावे, या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी अनेकदा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, त्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते. मात्र, नव्याने हजर झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी स्वतःहून जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात पुढाकार घेऊन प्रवेशद्वार क्रमांक दोन खुले केले. 

रिक्षांबाबत पोलिसांना पत्रव्यवहार 

जिल्हा परिषद प्रवेशद्वार क्रमांक एक व दोन परिसरात रिक्षा उभ्या असतात. त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे पोलिस प्रशासनास पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. या परिसरात वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी या पत्रव्यवहारामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fear of encroachment opened the gates