चोरीची भीती, सांभाळा दुचाकी! पोलिसही हतबल

सूर्यकांत वरकड
सोमवार, 25 जून 2018

नगर : शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक उपाययोजना करूनही चोऱ्या थांबत नसल्याने, पोलिसही हतबल झाल्याचे दिसते. फक्त शहरातच पाच महिन्यांत 75 दुचाकींची चोरी झाली, तर त्यांतील अवघ्या दहा गुन्ह्यांची पोलिसांकडून उकल झाली. 

नगर : शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक उपाययोजना करूनही चोऱ्या थांबत नसल्याने, पोलिसही हतबल झाल्याचे दिसते. फक्त शहरातच पाच महिन्यांत 75 दुचाकींची चोरी झाली, तर त्यांतील अवघ्या दहा गुन्ह्यांची पोलिसांकडून उकल झाली. 

कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यांच्या हद्दीत काही दिवसांपासून दुचाकीचोरीचे प्रकार वाढले आहेत. मध्यंतरी पोलिसांनी दुचाकीचोरांची एक टोळी पकडली; पण त्यानंतर दुचाकीचोर शोधण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. शहरातील शासकीय कार्यालये, जिल्हा रुग्णालय, खासगी हॉस्पिटल, कापडबाजार, बसस्थानके, हॉटेलच्या बाहेर लावलेली दुचाकी वाहने चोरांसाठी पर्वणी ठरतात. 

त्यात जिल्हा परिषद व स्टेट बॅंकेसमोरून सर्वाधिक दुचाकी चोरीला जातात. शहरातील रुग्णालये, कार्यालयांच्या वाहनतळांमध्ये लावलेल्या दुचाकी वाहनांवर चोर बसतात. मालकाचा कानोसा घेत कुलूप तोडून बनावट चावीने दुचाकी सुरू करून पोबारा करतात. या टोळीमध्ये अल्पवयीन मुलांचा भरणा आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणाला शंकाही येत नाही. त्याच संधीचा फायदा ते घेतात. 

दुचाकी भंगारात 

शहरातून चोरलेली दुचाकी थेट भंगारात विकली जाते. ती विकताना दोन्ही चाकांसह तिचे अन्य भाग सुटे करून त्याऐवजी जुने भाग टाकले जातात आणि दुचाकी भंगारात विकली जाते. 

आरोपींकडून वापर

बहुतांश वेळा विविध गुन्ह्यांतील आरोपी प्रवासासाठी चोरीची दुचाकी वाहने वापरतात. पेट्रोल आहे तोपर्यंत प्रवास आणि पेट्रोल संपल्यानंतर दुचाकी सोडून पसार होतात. अशा दुचाकींचे मालकही शोधले जात नाहीत. 

दुचाकी पार्किंग करताना काळजी घेतली पाहिजे. व्यवस्थित कुलूप व पार्किंगची जागा सुरक्षित असली पाहिजे. पोलिसांनी बऱ्याच गुन्ह्यांचा शोध लावला आहे; पण दुचाकीच्या चेसी क्रमांकावर पंच मारल्यास ती मूळ मालकाला देण्यात अडचणी येतात. 

- रमेश रत्नपारखी, पोलिस निरीक्षक, कोतवाली 

चोरीची पाच महिन्यांची आकडेवारी 
भिंगार कॅम्प- 14 
तोफखाना- 22 
कोतवाली- 37 

Web Title: Fear of theft, a two-wheeler police is also ineffective