पावसाअभावी खरीप वाया जाण्याची भिती; 1.20 कोटी हेक्‍टरवर पेरणी 

तात्या लांडगे
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पाण्याअभावी राज्यातील सुमारे 43 लाख हेक्‍टरवरील पिके आता वाया जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 
 

सोलापूर : राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मागील महिन्यापासून पाऊसच झाला नाही. त्याचा परिणाम खरीप पेरणीवर झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र 2.51 लाख हेक्‍टरने घटले. राज्यात आतापर्यंत एक कोटी 20 लाख 66 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पाण्याअभावी राज्यातील सुमारे 43 लाख हेक्‍टरवरील पिके आता वाया जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

राज्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र एक कोटी 49 लाख 74 हजार हेक्‍टर असून त्यामध्ये 25 लाख 76 हजार हेक्‍टर उसाचे सरासरी क्षेत्र आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला. जून-जुलै महिन्यात बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामध्ये काही धरणे, लहान-मोठे कालवे, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले. परंतु, पाऊस कमी झाल्याने धरणांमधील पाणी आगामी काळासाठी राखून ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शासनाने सर्व जिल्ह्यांतील खरीप पिकांचा अहवाल मागविला असून त्यानुसार राज्यातील पेरणी झालेल्यापैकी निम्मी पिके पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पिके आता फुलोऱ्यात आली असून आता त्या पिकांसाठी खऱ्या अर्थाने पाण्याची गरज आहे. परंतु, पावसाने दडी मारल्याने अक्‍कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील सुमारे 40 हजार हेक्‍टरवरील खरीप पिके वाया जाण्याची शक्‍यता असल्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. - बसवराज बिराजदार, कृषी अधीक्षक कृषी अधिकारी 

आकडे बोलतात... 
(2017-18) 
खरीप पेरणीचे क्षेत्र - 1,23,15,000 हेक्‍टर 
जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण - 78.1 टक्‍के 
(2018-19) 
खरीप पेरणीचे क्षेत्र - 1,20,66,000 हेक्‍टर 
पावसाचे प्रमाण - 93.1 टक्‍के

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Fear of wasting kharip crops due to lack of rainfall