भोगावती नदीकाठावर जलजन्य आजारांची भीती

भोगावती नदीकाठावर जलजन्य आजारांची भीती

कोल्हापूर - मागील चार-पाच महिन्यांत भोगावती नदीकाठच्या गावांना जलजन्य आजारांचा तडाखा बसला आहे. जवळपास ३१ गावे काविळीने बाधित झाली होती. या ठिकाणी काविळीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे धाव घेतली. 

‘एनआयव्हीच्या’ टीमने भोगावती परिसरातून पाण्याचे ८६ नमुने घेतले. यातील बहुतांश नमुने दूषित आढळले. या पाण्यात ‘हिपॅटायटिस ए’च्या विषाणूने कावीळ झाल्याचे निदर्शनास आले. दक्षिण महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा विषाणू सापडल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गावोगावचे जलशुद्धीकरण व्यवस्थित झाले नाही, तर भोगावतीसह पंचगंगा नदी काठावरही जलजन्य आजार बळावू शकतो, अशी भीती आरोग्य यंत्रणेने व्यक्‍त केली आहे.

चार महिन्यांत भोगावती नदीकाठी ‘हिपॅटायटिस ए’ या विषाणूने काविळीचा विळखा पडला. एकदमच मोठ्या प्रमाणात ही साथ आल्याने या आजाराची शोधमोहीम सुरू झाली. जवळपास ३१ गावांमध्ये या विषाणूमुळे कावीळ झाली असल्याचे निष्कर्ष निघाले. ही कावीळ येण्यामागे ऊसतोडीच्या काळात नदीच्या काठी असणारा ऊसतोडी कामगारांचा मुक्‍काम, हे मुख्य कारण असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. मानवी विष्ठा पाण्यात मिसळल्यानेच या प्रकारचे विषाणू निर्माण झाल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे. जर पिण्याचे पाण्याचे योग्य क्‍लोरीनेशन झाले तर हे विषाणू मारता येतात; मात्र क्‍लोरीनेशन व्यवस्थित नसल्याचा ठपका आरोग्य विभागाने ग्रामपंचायत विभागावर ठेवला आहे. 

दुसऱ्या बाजूला ठिकपुर्ली, राशिवडे या मोठ्या गावांत काविळीचे रुग्ण आढळल्यानंतर पाण्याचे नमुने घेण्यात आले. तसेच गावाचे सर्वेक्षणही करण्यात आले. या वेळी राशिवडे येथील पाणी योजनेला शंभरपेक्षा अधिक ठिकाणी असलेली गळती पाहून आरोग्य यंत्रणाही चक्रावून गेली. १९६० सालातील योजना असल्याने याची गळती काढता येत नसल्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतल्याने, या गावाबाबत काय निर्णय घ्यायचा, असा प्रश्‍न आरोग्य यंत्रणेला पडला आहे. साथ रोग नियंत्रण करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर सोडून ग्रामपंचायत, पाणीपुरवठा व पाणी स्वच्छता विभाग मात्र याबाबत नामानिराळा राहत असल्याचे चित्र आहे. एकंदर गावागावांत असणाऱ्या नळ पाणी योजनांची गळती आणि  पिण्याचे पाण्याचे शुध्दीकरण न  झाल्यास, जलजन्य आजाराचा मोठा संसर्ग होण्याची शक्‍यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. 

राधानगरी धरणालाही प्रदूषणाचा फटका
आत्तापर्यंत नदी, विहिरी व कूपननलिकांचे पाणी प्रदूषित झाल्याचे पाहण्यात होते, मात्र यावेळी थेट धरणातील पाणीच प्रदूषित होण्याचा धक्‍कादायक प्रकार पुढे आला आहे. राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमधील काही भागात मानवी विष्ठेमुळे जलप्रदूषण झाल्याचा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा अहवाल आहे. सर्वात शुद्ध समजल्या जाणाऱ्या राधानगरी धरणाच्या पाण्याचेच प्रदूषण झाल्याच्या अहवालाने आरोग्य यंत्रणाही हडबडून गेली. मोठ्या प्रमाणात बॅकवॉटरच्या काठावर क्‍लोरीनेशन करण्यात आले. आता या पाण्याची चाचणी घेतली असता हे पाणी प्रदूषित नसल्याचे आढळून आले.

चार महिन्यांत ‘हिपॅटायटिस ए’ या विषाणूमुळे जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले होते. याला मानवी विष्ठा हे प्रमुख कारण आहेच;  पण पाणी योजनांना असणारी गळतीही तितकीच कारणीभूत आहे. राधानगरी धरणातील एक नमुनाही प्रदूषित आढळला होता, मात्र आरोग्य यंत्रणेने तत्काळ कारवाई केल्याने या प्रदूषणावर नियंत्रण मिळवले. पाणी, स्वच्छता, ग्रामपंचायत अशा सर्वच विभागांनी आपापली जबाबदारी पार पाडल्यास व योग्य क्‍लोरीनेशनने हा विषाणू मारता येतो. आता पावसाळ्यात क्‍लोरीनचा दीडपट डोस देऊन जलजन्य आजारावर नियंत्रण आणले जाणार आहे. 
- डॉ. योगेश साळी,
जिल्हा आरोग्य अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com