सांगली : भ्रूणहत्या करून विल्हेवाट न लावल्याचे उघड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

माधवनगर रेल्वे पुलाजवळ कलानगर परिसरात एका गॅरेजध्ये काम करणाऱ्या सईद मुल्ला यांना प्रथम हा प्रकार समजला. साडेअकराच्या सुमारस कुत्र्यांची टोळी तेथे आली होती. मुल्ला यांनी कुत्र्यांना हुसकावले. नेमका प्रकार पाहण्यास ते नाल्याजवळ गेले. त्यांना अर्भक टाकून दिल्याचे दिसले.

सांगली - माधवनगर रस्त्यावरील कलानगर परिसरात नाल्यात टाकून दिलेले मृत अर्भक आज आढळले. सकाळी साडेअकराच्या सुमारास नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. तेथे मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली. अर्भकाचे डोके प्रमाणापेक्षा मोठे असल्याने गर्भपात केला असावा. परंतू त्याची विल्हेवाट न लावता टाकून दिल्याने अवैध भ्रूणहत्येचा संशय बळावला आहे.

म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. खिद्रापुरेचे भ्रूण हत्याकांड ताजे असताना हा प्रकार अघड झाल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पोलिसांकडून व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, की माधवनगर रेल्वे पुलाजवळ कलानगर परिसरात एका गॅरेजध्ये काम करणाऱ्या सईद मुल्ला यांना प्रथम हा प्रकार समजला. साडेअकराच्या सुमारस कुत्र्यांची टोळी तेथे आली होती. मुल्ला यांनी कुत्र्यांना हुसकावले. नेमका प्रकार पाहण्यास ते नाल्याजवळ गेले. त्यांना अर्भक टाकून दिल्याचे दिसले. ते छिन्नविछिन्नावस्थेत असल्याचे समजले नाही. अर्भक पुरुष की स्त्री जातीचे हेही समजले नाही, त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसही नेहमीप्रमाणे दोन तास उशीरा घटनास्थळी आले. तोवर प्रकार परिसरात पसरला. बघ्यांचीही गर्दी जमली. पुलावरील वाहतूकही काहीकाळ खोळंबली. 

पोलिस आल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. अर्भकाचे डोके प्रमाणापेक्षा अधिक असल्याने हा गर्भपाताचा प्रकार असावा, परंतु गर्भपात केला, तरी त्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित डॉक्‍टरची होती. अर्भक आले कोठून, टाकले कुणी याचा तपास पोलिस करीत आहे. शहर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. 
म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांड प्रकरणानंतर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अजून झोपलेलीच आहे का असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Web Title: fetus found in Sangli