
जिल्ह्यातील 141 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात प्रचाराचे धुमशान सुरु आहे. शुक्रवारी ( ता. 15) मतदान होणार आहे. मतदारांच्या गोठी, भेटी, पदयात्रांवर भर दिला जातो आहे.
सांगली : जिल्ह्यातील 141 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात प्रचाराचे धुमशान सुरु आहे. शुक्रवारी ( ता. 15) मतदान होणार आहे. मतदारांच्या गोठी, भेटी, पदयात्रांवर भर दिला जातो आहे. सत्तेसाठी मतदारांची तोडफोड सुरु आहे. पहिल्या टप्प्यात पॅनेल टु पॅनेल मते मागणारे उमेदवार शेवटच्या टप्प्यात वैयक्तिक मतांसाठी फिल्डिंग लावलेली आहे. यामुळे गावातील प्रभागाप्रभागात पॅनेल फुटून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पॅनेलप्रमुखांनी याची धास्ती घेतलेली आहे. खुल्या गटातील सर्वच लढती चुरशीने होत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपापल्या स्थानिक आघाड्यांची मिनी मंत्रालयावर झेंडा फडकवण्यासाठी पॅनेलप्रमुखांनी कंबर कसली आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. शेवटच्या दोन दिवसांत काहीही करा, समोरच्या पॅनेलची मते फोडा, नव्याने जोडा त्यासाठी साम-दाम, तडजोडीची भूमिका सर्वांनीच घेतली आहे. पॅनेलमध्येही शेवटच्या टप्प्यात प्रचारात एकवाक्यता दिसत नाही. जशी संधी मिळेल तसे अनेक उमेदवार स्वतःसाठी एकेक मत मागायला लागले आहेत.
तडजोडीच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंगची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून कार्यकर्त्यांसाठी सुरू झालेल्या जेवणावळी मतदानानंतरच थांबणार आहेत. गावागावांत पॅनेलच्या प्रचारासाठीच्या गाड्या आमने-सामने भिडत आहेत. काही प्रभागात उमेदवार बाजूला राहिले असून त्यांच्या नेत्यांतच निवडणुकीत जुंपल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात दुरंगी आणि अपवादात्मक स्थितीत तिरंगी तर काही ठिकाणी अपक्ष रिंगणात आहेत. पदयात्रांनी धुरळा उडतोय. निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस राहिल्याने काऊंटडाऊन सुरू झाले आहे. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची फौज कामाला लागली आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार