प्रलंबित कामे पंधरा दिवसांत मार्गी लावा - शौमिका महाडिक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील प्रलंबित कामे पंधरा दिवसांत मार्गी लावावीत, अशा सूचना सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिल्याची माहिती अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील प्रलंबित कामे पंधरा दिवसांत मार्गी लावावीत, अशा सूचना सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिल्याची माहिती अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आठवडाभरात सौ. महाडिक यांनी सर्व विभागांचा आढावा पदाधिकाऱ्यांसह घेतला. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ""आढावा बैठकीच्या माध्यमातून त्या त्या विभागांचे काम कशाप्रकारे चालते, याची माहिती घेतली. जिल्हा परिषदेमार्फत विविध विभागांतून 122 योजना राबवल्या जातात. त्याचीही माहिती करून घेतली. या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.''

त्या म्हणाल्या, 'शिक्षण विभागाविषयी तक्रारी, या आढावा बैठकीत समजल्या. कलाकारांच्या मानधनाचा प्रश्‍नही बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असल्याची माहिती दिली. जिल्हा परिषदेत कोणताही धोरणात्मक निर्णय घ्यायचा झाल्यास त्याची माहिती अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना दिलीच पाहिजे, अशा सूचनाही दिल्या आहेत.

पदाधिकारी व प्रशासन हातात हात घालून काम करतील, असे नियोजन करावे, असे प्रशासनाला सांगितले आहे.''

दर सोमवारी व शुक्रवारी त्या त्या विभागांचे प्रमुख कार्यालयात असलेच पाहिजेत. याशिवाय ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची कामे होण्यासाठी कार्यालयात किमान कक्ष अधिकारी तरी उपस्थित असलेच पाहिजेत. पूर्व परवानगीशिवाय विभागप्रमुखांनी कार्यालयात गैरहजर राहू नये, असेही प्रशासनाला या आढावा बैठकीच्या निमित्ताने सांगितल्याचे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, 'पदाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक नियुक्तीवरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. यावरून पदाधिकाऱ्यांतील नाराजीही दूर झाली आहे. ग्रामीण भागातून कामासाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले जातील.''

21 एप्रिलला पाणीटंचाई बैठक
पाणीटंचाई व पंचगंगा प्रदूषणाबाबत 21 एप्रिलला सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रशासन यांची एकत्रित बैठक बोलविली आहे. सध्या तीव्र पाणीटंचाई जिल्ह्यात कोणत्याही गावांत पाहायला मिळत नाही. या बैठकीत त्याचा आढावा घेऊन पुढील उपाययोजनांवर चर्चा करण्यात येईल, अशी माहितीही सौ. महाडिक यांनी दिली.

Web Title: fifteen days pending works way