esakal | बेळगावात 51 हजार कामगार सहाय्यधनाच्या प्रतिक्षेत 
sakal

बोलून बातमी शोधा

fifty one thousands workers awaiting assistance in Belgaum

कोरोनामुळे बांधकाम कामगारांना काम नसल्याने कर्नाटक सरकारने या कामगारांना पाच हजार रुपयांचे सहाय्यधन देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अजूनही बहुतांशी कामगारांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत.

बेळगावात 51 हजार कामगार सहाय्यधनाच्या प्रतिक्षेत 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील 80 हजार बांधकाम कामगारांपैकी फक्त 29 हजार कामगारांच्या खात्यावर पाच हजार रुपयांचे सहाय्यधन जमा झाले आहे. अजून 51 हजार कामगार सहाय्यधनाच्या प्रतिक्षेत आहेत. सर्व कामगारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही तर लॉकडाऊन हटल्यानंतर आंदोलन करण्याचा इशारा ऍड. एन. आर. लातूर यांनी दिला आहे. 

कोरोनामुळे बांधकाम कामगारांना काम नसल्याने कर्नाटक सरकारने या कामगारांना पाच हजार रुपयांचे सहाय्यधन देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अजूनही बहुतांशी कामगारांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. बेळगाव जिल्ह्यात सुमारे 60 हजार बांधकाम कार्ड असलेले कामगार आहेत, इतर 20 हजार जण कार्ड बनवून घेत आहेत. बेळगाव जिल्हा बांधकाम आणि इतर कामगार संघटनेच्यावतीने कार्ड बनवून दिले जात आहे. 

बांधकाम कामगारांच्या खात्यावर त्वरीत पैसे जमा करण्याची ऑनलाईन तक्रार मुख्यमंत्री व कामगार मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तसेच येथील कामगार उपायुक्त व्यंकटेश शिंधीहट्टी, आमदार अनिल बेनके यांना प्रत्यक्ष भेटून ऍड. लातूर यांनी तक्रार केली आहे. 

कामगार कार्ड बनविण्यासाठी 1 वर्षात 90 दिवस राज्यात काम केलेले असावे. यासाठी जन्म तारीख दाखला, आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक पाहिजे), रेशनकार्ड, एक फोटो, बॅंक पासबूक, कामगार संघाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे कामगार सेवा केंद्र किंवा सेवा सिंधू सेंटरमध्ये जमा करण्यास सांगितले असून यासाठी 50 रुपये फी आकारणी केली जात आहे. यानंतर 15 दिवसात कामगार कार्ड मिळते. यासाठी फक्त 50 रुपये फी आकारली जाते. मात्र, काही ठिकाणी कार्ड बनविण्यासाठी 500 रुपये आकारणी केली जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 

गवंडी, हेल्पर, बार वेंडर, कारपेंटर, टाईल फिटींग, फॅबरिकेशन, पेटींग, रोडवर्क, गटर वर्क आदी कामगार यामध्ये येतात. हा लाभ घेण्यासाठी कामगार कार्ड, बॅक पासबुक, आधार कार्ड हे दाखले गरजेचे आहेत. लॉकडाऊन असल्याने ही कागदपत्रे कामगार अधिकाऱ्यांना व्हॉट्‌स ऍपवर पाठवण्याचे आवाहन केले आहे. 

आंदोलन करणार

अनेक कामगार या सुविधांपासून वंचित असून ऑनलाईनद्वारे एन. आर. लातूर मार्गदर्शन करत आहेत. सरकारने लॉकडाऊन हटेपर्यंत कामगारांच्या खात्यावर पैसे जमा केले नाही तर लॉकडाऊननंतर आंदोलन करणार असल्याचे कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांनी सांगितले. 

--------------------------------------------------- 

loading image
go to top