राजकीय दमणशाहीविरुद्ध अहिंसेने लढू - डॉ. एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - सर्किट बेंचच्या लढ्यासाठी राजकीय दमणशाहीविरोधात अहिंसेची शक्ती उभारण्याची गरज आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरून सनदशीर मार्गाने आंदोलन करू. त्यात सर्वच घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ विचावंत डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांनी केले. न्याय संकुलासमोर सुरू असलेल्या वकिलांच्या साखळी उपोषणाच्या आजच्या 84 दिवशी माजी नगरसेवक पदाधिकारी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केलेल्या उपोषणाच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, 'सनदशीर मार्गाने गेले 84 दिवस सुरू असलेल्या साखळी उपोषणाची दखल सरकार घेत नाही. त्यामुळे सरकारच्या मानसिकतेचा विचार करताना त्याचे प्लस आणि विक पॉईंट विचारात घेण्याची वेळ आली आहे. सिंहासनाला हादरा बसल्याशिवाय ते कोणाचीही मागणी मान्य करीत नाहीत, हा इतिहास आहे. सरकारच्या धोरणांचा विचार करून अहिंसेची शक्ती उभारण्याची वेळ आली आहे. मी या शहराचा ऋणी आहे. शहरात घर नव्हे मतदार यादीत नाव नसताना येथील तमाम जनतेने मला निवडणुकीसाठी उभेच केले नाही, तर निवडूनही आणले. या सदनशीर लढ्यात माझाही सहभाग असणार आहे. मुख्यमंत्री आजही खंडपीठ कृती समितीची भेट घेत नाहीत. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे चर्चेसाठी वेळ मागितली होती. त्यांनी आचारसंहिता झाल्यानंतर म्हणजेच रविवारी (ता. 26) वेळ दिली आहे. शासकीय विश्रामगृहात दुपारी 12 वाजता होणाऱ्या बैठकीत पालकमंत्र्यांकडे सर्किट बेंचबाबत पाठपुरावाही करूया.''

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'सर्किट बेंचबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांच्यामार्फत हा प्रश्‍न लवकर मार्गी लागावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.''

अवचट यांना निवेदन
सर्किट बेंच मागणीचे निवेदन उपोषणकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी मुख्य न्यायाधीश आर. जी. अवचट यांना दिले. उपोषणकर्त्यांनी तमाम जनतेच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोचवा, अशी विनंती या वेळी अवचट यांना केली.

Web Title: Fight violence against political