रस्ता खोदल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा

File a road excavation
File a road excavation

नगर ः महानेट प्रकल्पामार्फत ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणी दिली जात आहे. या जोडणीसाठी जिल्हा परिषदेचे रस्ते विनापरवाना खोदण्यात आलेले आहे. याबाबत सकाळमध्ये "महानेट'साठी रस्त्यांची खोदाई या मथळ्याखाली वृत्तप्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन नगर पंचायत समितीने संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव केला आहे. 

राज्यातील सुमारे 13 हजार ग्रामपंचायतींना उच्च क्षमतेची इंटरनेट जोडणी महानेट (भारत नेट - दुसरा टप्पा) प्रकल्पामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्य सरकारच्या 100 टक्के मालकीच्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे. 

पारगाव (भातोडी), सोनेवाडी, पिंपळगाव लांडगा आदी गावांत तीन किलोमीटरचे खोदकाम केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व रस्ते जिल्हा परिषदेंतर्गत येतात. यासाठी संबंधित यंत्रणेने परवानगी घेतली नाही. परिणामी, जिल्हा परिषदेचे नुकसान झाले आहे. याबाबत नागरिकांनी नगर पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रारीही केल्या होत्या. त्यातच याबाबतचे सचित्र वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताची दखल नगर पंचायत समितीने घेतली. पंचायत समितीच्या मासिक बैठकी सभापती रामदास भोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीमध्ये विनापरवाना रस्त्याची खोदाई करण्यात आल्याचा मुद्दा सभेत उपस्थित झाल्यानंतर सर्वच सदस्य आक्रमक झाले. आपली कोणतीच परवानगी न घेता परस्पर रस्त्यांची खोदाई कशी झाली, अशी विचारणा शाखा अभियंत्यांना करण्यात आली. दरम्यान शाखा अभियंता शिवाजी राऊत यांनी आपण घटनास्थळाची पहाणी केलेली असून संबंधितांनी जिल्हा प्रशासनाकडून कुठलीच परवानगी घेतलेली नाही, असे सभागृहाला सांगितले. त्यानंतर संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव याबैठकीत करण्यात आला. तशा सूचना सभापती भोर यांनी संबंदितांना दिल्या आहेत. 

रस्त्याची दुरुस्ती करून घ्या 

"महानेट'साठी रस्त्यांची खोदाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे रस्ता खराब झालेला आहे. या खराब रस्त्याची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 

विनापरवाना रस्त्याची खोदाई 

नगर तालुक्‍यातील पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी आदी परिसरात विनापरवाना रस्त्याची खोदाई करण्यात आलेली आहे. रस्त्याची विनापरवाना खोदाई करणाऱ्या ठेकेदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्याचा ठराव पंचायत समितीच्या बैठकीत घेतलेला असून तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. 

-रामदास भोर, सभापती, नगर पंचायत समिती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com