चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

शोभायात्रेतून चित्रतपस्वींना सलाम...! 
चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती सोहळा; चित्ररथांसह पारंपरिक वाद्यांचा थाट. लावणी नृत्याविष्कारासह झांजपथक, हालगी-घुमक्‍यासह शिवकालीन युद्धकलांची थरारक प्रात्यक्षिके, पारंपरिक लवाजमा ही शोभायात्रेची वैशिष्ट्ये राहिली.

कोल्हापूर :  भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला तो कलापुरात...मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीला अनेक महत्त्वाचे नियम घालून देण्यातही योगदान येथील चित्रतपस्वींचे....सिनेसृष्टीत अनेक नावीण्यपूर्ण संकल्पना पुढे आल्या त्या कलापूर कोल्हापुरातूनच, या साऱ्या देदीप्यमान इतिहासाला आज शोभायात्रेतून अभिवादन झाले.

मराठी सिनेसृष्टी येथे रुजवणाऱ्या चित्रतपस्वींना यानिमित्ताने तमाम कलाकार आणि तंत्रज्ञांतर्फे सलाम करण्यात आला. 
मराठी चित्रपट व्यावसायिक समितीतर्फे आयोजित कोल्हापूर चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्याला या शोभायात्रेने दिमाखदार प्रारंभ झाला.

खरी कॉर्नर  कॅमेरा मानस्तंभापासून शोभायात्रेला सुरूवात

जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभापासून शोभायात्रा सुरू झाली. महाव्दार रोड, पापाची तिकटी, शिवाजी पुतळा, बिंदू चौक मार्गे राजर्षी शाहू स्मारक भवन असा शोभायात्रेचा मार्ग राहिला.

जुने दुर्मिळ कॅमेरेही शोभायात्रेत लक्षवेधी

1 डिसेंबर 1919 ला येथे स्थापन झालेली महाराष्ट्र फिल्म कंपनी, "सैरंध्री' चित्रपटाची निर्मिती, "अयोध्येचा राजा' चित्रपटातील प्रसंग चित्ररथातून साकारण्यात आले. लावणी नृत्याविष्कारासह झांजपथक, हालगी-घुमक्‍यासह शिवकालीन युद्धकलांची थरारक प्रात्यक्षिके, पारंपरिक लवाजमा ही शोभायात्रेची वैशिष्ट्ये राहिली. कोल्हापूर चित्रनगरीच्या चित्ररथासह जुने दुर्मिळ कॅमेरेही शोभायात्रेत लक्षवेधी ठरले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Film Festival Start With Rally