बाजार समितीवर अखेर प्रशासक नियुक्त...मुदतवाढीची मागणी फेटाळली

घनश्‍याम नवाथे
Friday, 28 August 2020

सांगली-  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर आज प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ की प्रशासक नियुक्ती याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, प्रभारी पणनमंत्री जयंत पाटील यांनी आज प्रशासक नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला. सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम आणि आमदार विक्रम सावंत यांनी संचालक मंडळाच्या मुदतवाढीसाठी आग्रह धरला होता, परंतु जयंत पाटील यांनी प्रशासक नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर आज प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सूत्रे हाती घेतली. 

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 2015 मध्ये झाली होती. दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विक्रम सावंत यांच्या पॅनेलविरोधात पालकमंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव जगताप आणि दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पॅनेलने लढत दिली होती, परंतु निवडणूक एकतर्फीच झाली. डॉ. कदम यांच्या पॅनेलने सतरापैकी चौदा जागांवर विजय मिळवला, तर विरोधी पॅनेलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. अडीच वर्षांपूर्वी राजकीय समीकरणे बदलली जाऊन विरोधी गटातील संचालक दिनकर पाटील यांची सभापतिपदी वर्णी लागली. त्यानंतर सध्या बाजार समितीमध्ये सत्ताधारी व विरोधक यांचा एकत्रित कारभार सुरू होता. 

दरम्यान, संचालक मंडळाची पाच वर्षाची मुदत बुधवारी (ता.26) संपली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न अधिनियम 1963 मधील कलम 14 (3)(अ) च्या तरतुदीनुसार राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका 24 जुलै 2020 पासून सहा महिने कालावधीसाठी पुढे ढकलल्या आहेत. परंतू सांगलीत संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासक की संचालकांना मुदतवाढ द्यायची याकडे लक्ष लागले होते. पणनमंत्री बाळासाहेब पाटील हे कोरोना बाधित असल्यामुळे त्यांचा पदभार पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम आणि आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज मुंबई येथे जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. विद्यमान संचालक मंडळांना मुदतवाढ मिळावी यासाठी त्यांनी आग्रह धरला. तसेच कॉंग्रेसच्या राज्यातील नेतेमंडळींनीही संचालकांच्या मुदतवाढीसाठी प्रयत्न केले, परंतु जयंत पाटील हे प्रशासक नियुक्तीच्या भूमिकेवर अखेरपर्यंत ठाम राहिले. प्रशासक नियुक्तीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले. सायंकाळी जिल्हा उपनिबंधक करे यांची प्रशासक म्हणून नियुक्तीचा आदेश प्राप्त झाला. त्यानंतर श्री. करे यांनी सायंकाळी प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली. 
 
""प्रशासक म्हणून नियुक्तीचा आदेश आज प्राप्त झाला. त्यानंतर बाजार समितीची सूत्रे आज सायंकाळी हाती घेतली आहेत. आता प्रशासक मंडळाबाबत पुढील निर्णय शासनस्तरावरून घेतला जाईल.'' 
-नीळकंठ करे (जिल्हा उपनिबंधक) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, an administrator was appointed on the market committee. The demand for extension was rejected