अखेर पृथ्वीराज चव्हाण यांचे उदयनराजेंना आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

लोकांनी निवडून दिल्यानंतर चारच महिन्यांत तुम्ही जर पक्षांतर करत असाल, तर तो लोकशाहीचा खूनच आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील.

कऱ्हाड ः जनतेला गृहीत धरून ज्यांनी पक्षांतर केले. आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल. जनतेने निवडून दिल्यानंतर अवघ्या चारच महिन्यांत पक्ष बदलणे हा लोकशाहीचा केलेला खूनच आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. माजी खासदारांनी एकही काम सुचवले नाही. तसे सुचवले असेल तर त्यांनी त्याची कागदपत्रे दाखवावीत, असे आव्हान त्यांनी दिले. 

उदयनराजेंच्या विरोधात आपण निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर श्री. चव्हाण म्हणाले, ""मी कऱ्हाड दक्षिणमधूनच विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. खासदारकीत मला रस नाही. मात्र, येथे कोणता उमेदवार द्यायचा ते राष्ट्रवादीने ठरवावे. त्यासह आघाडी कशी व्हावी, याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे.'' उदयनराजेंनी सुचवलेले काम आपण केले नाही, असा आरोप करत आहेत. त्यावर ते म्हणाले, ""उदयनराजेंनी कोणते काम सुचवले होते. तसा कोणता प्रस्ताव त्यांनी दिला होता. याची कागदपत्रे त्यांनी द्यावीत. उगाच काहीही बोलून उपयोग नाही. त्यांनी एकही प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे त्यांचे काम रखडवण्याचा प्रश्नच येत नाही.'' लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार आहे. तुम्ही आमच्यावर टीका केली, तरी त्याचे उत्तर आम्ही देणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार चव्हाण म्हणाले, ""लोकशाहीत जनतेला गृहीत धरून निर्णय घेऊ नयेत. जनतेचा कौल काय आहे, त्यांच्या विकासाचे नेमके स्त्रोत्र काय आहे, या सगळ्याचा सारासार विचार होणे गरजेचे आहे. लोकांनी निवडून दिल्यानंतर चारच महिन्यांत तुम्ही जर पक्षांतर करत असाल, तर तो लोकशाहीचा खूनच आहे. या वक्तव्यावर मी ठाम आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील.'' 

आमदार आनंदराव पाटील यांनी केलेल्या टीकेसंबंधी श्री. चव्हाण यांनी "नो कॉमेंट्‌स' असे उत्तर दिले. कऱ्हाडला भूकंप संशोधन केंद्र आणले. मात्र, तुम्ही त्यासाठी केवळ 48 कोटी दिले. राहिलेले पैसे भाजप सरकाने दिले आहेत, अशी टीका होत आहे, त्यावर ते म्हणाले, ""भाजपचे सरकार आहे, त्यांना पैसे द्यावेच लागणार आहेत. तो सरकारी प्रकल्प आहे. कॉंग्रेसचा नाही. काहीही बोलून आणि मनोरंजन करणाऱ्या टीका योग्य नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो प्रकल्प माझ्यामुळे आला किंवा आणला गेला, हे ते मान्य करत आहेत. हेही महत्त्वाचे आहे. उर्वरित रक्कम कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी ते देणारच आहेत. त्यामुळे त्यात विशेष काय?'' विकासकामे माझ्या पत्राने मंजूर झाली आहेत. त्याच्या मंजुरीचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांनी कधीही तशी पत्रे दाखवावीत.

ज्येष्ठ नेते विलासराव पाटील- उंडाळकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या घराला स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा आहे. त्यांच्यासह त्या घराबद्दल मला आदरच आहे. देश एकसंध ठेवण्याचा विचार करणारे उंडाळकर कुटुंब कधीही जातीयवादी पक्षाला मदत करणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. 

"डायरीचे चावडीवर वाचन करा' 
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या खिशातील डायरी आमच्याकडे आली आहे, अशी टीका अतुल भोसले जाहीर सभेत करत आहेत. त्याबाबत विचारले असता आमदार चव्हाण म्हणाले, ""डायरीच तुमच्याकडे आली आहे, तर त्या डायरीचे तुम्ही चावडी वाचन करावे. सगळ्यांना कळू दे ना, त्या डायरीत काय आहे ते. त्यामुळे त्या डायरीचे बिनधास्त वाचन करावे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, Prithviraj Chavan's challenges to Udayanraje