आर्थिक "आणीबाणी' कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

सातारा - नोटा बदलण्याचा निर्णय झाल्यानंतर मागणीनुसार नवीन पैशांचा पुरवठा बॅंकेतून होत नसल्याने सध्या जिल्ह्यात "आर्थिक आणीबाणी'ची परिस्थिती निर्माण झाली आहे. खिशात नोटा असूनही नोटा बदलण्यासाठी, तसेच सुट्या पैशांसाठी दारोदारी विनवणी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. खात्यावर पैसे असूनही ते मिळत नसल्याने खरेदीला टाळाटाळ केली जात असल्याने नोटा बंदीच्या निर्णयानंतर सातव्या दिवशीही जिल्ह्यातील बाजारपेठा धिम्म्याच सुरू आहेत.

सातारा - नोटा बदलण्याचा निर्णय झाल्यानंतर मागणीनुसार नवीन पैशांचा पुरवठा बॅंकेतून होत नसल्याने सध्या जिल्ह्यात "आर्थिक आणीबाणी'ची परिस्थिती निर्माण झाली आहे. खिशात नोटा असूनही नोटा बदलण्यासाठी, तसेच सुट्या पैशांसाठी दारोदारी विनवणी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. खात्यावर पैसे असूनही ते मिळत नसल्याने खरेदीला टाळाटाळ केली जात असल्याने नोटा बंदीच्या निर्णयानंतर सातव्या दिवशीही जिल्ह्यातील बाजारपेठा धिम्म्याच सुरू आहेत.

जिल्हाभरात शहर, ग्रामीण भागातील राष्ट्रीयीकृत बॅंकांसमोर आज सातव्या दिवशीही नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या होता. "एटीएम'मधून पैसे मिळत आहेत, असे समजताच "एटीएम'समोर भल्या मोठ्या रांगा लागत होत्या. त्यामुळे एटीएमही लगेच रिकामे झाली. खात्यावर पैसे असूनही पैसे मिळत नाहीत, पाचशे, हजार रुपयांच्या नोटा असतानाही त्या बदलून मिळत नाहीत, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नागरिक पूर्णतः बेजार झाले आहेत.

पाचशे, हजार रुपयांच्या नोटा वापराचे बाजारपेठेत प्रमाण 85 टक्के आहे. मात्र, या नोटा बंद झाल्याने पाच, दहा, 20, 50 तसेच 100 रुपये या 15 टक्के व्यवहार चालणाऱ्या नोटावर बाजारपेठ कशीबशी सुरू आहे. परिणामी, हॉटेल, किराणा, भाजीमंडई, आठवडे बाजार, स्वीट मार्ट, कपडे यांच्या व्यापारावर त्याचा अनिष्ट परिणाम झाला आहे. दरम्यान, बोटावर शाई लावून नोटा बदलून देण्यात येत असल्याने "ब्लॅक'गिरीवर जालीम उपाय होत असल्याची चर्चाही सुरू आहे.

दोन हजारांच्या नोट त्रासदायक
"एटीएम'मधून शंभर रुपयांचा नोटा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे तरी त्याचे प्रमाण मागणीपेक्षा अत्यल्प ठरत आहे. बॅंकांमधून दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. अद्याप पाचशे रुपयांची नवीन नोट बॅंकांमध्ये आली नाही. ग्राहकांच्या हाती दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत; परंतु बाजारामध्ये गेल्यानंतर दुकानदारांकडे या नोटेसाठी नागरिकांना परत देण्यासाठी 100 च्या नोटा उपलब्ध नाहीत. यामुळे सद्यःस्थितीत बाजारपेठांमध्ये सुट्ट्या रकमांचा तुटवडा भासत आहे. जवळ पैसे असूनही व्यवहार करता येत नसल्याने दोन हजारांच्या नोटाही त्रासदायक ठरत आहेत.

ऑल टाइम बंद - "एटीएम'
शंभर रुपयांच्या अपुऱ्या नोटा, नवीन पाचशेच्या नोटांचा तुटवडा, एटीएम मशिनमध्ये न झालेले तांत्रिक बदल, अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील बहुतेक एटीएम मशिन बंद असल्याचे आजही चित्र होते. एटीएम सुविधा कधी सुरू होणार, या संदर्भात बॅंकांकडे चौकशी केली, की त्यांच्याकडूनही हात वर केले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नोटा भरणाऱ्या एजन्सी प्रामुख्याने रात्रीच्या वेळेत एटीएममधे नोटा भरतात. त्यानंतर सकाळी अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये या नोटा संपून जातात, त्यामुळे एटीएम शो-पीस ठरत असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्‍त केले.

Web Title: Financial emergency permanent

टॅग्स