नैसर्गिक नाले शोधून अतिक्रमणे हटवा... नागरिक जागृती मंचची मागणी 

घनश्‍याम नवाथे
Thursday, 15 October 2020

सांगली-  महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीनंतर निर्माण होणारी पूर परिस्थिती आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा शोध घ्यावा. त्यावरील अतिक्रमण दूर करून शहरात साचणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे. 

सांगली-  महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीनंतर निर्माण होणारी पूर परिस्थिती आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा शोध घ्यावा. त्यावरील अतिक्रमण दूर करून शहरात साचणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे. 

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका हद्दीमधील बराच मोठा भाग हा नदी काठी वसलेला आहे. शहरात अतिवृष्टी झाली की अस्तित्वात नसलेले आणि नामशेष केलेल्या ओढ्या-नाल्याचा परिसर तुडूंब भरतो. नागरिकांच्या घरात पाणी घुसते. तसेच पाण्याचा तत्काळ निचरा होत नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येते. शहरातील मूळ नैसर्गिक प्रक्रियेला गेल्या काही वर्षात धक्का पोहोचवला आहे. त्यामुळे अशांचा शोध घेऊन कारवाई करणे आवश्‍यक आहे. तसेच तत्काळ महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्याच्या सद्य परिस्थितीचा "ड्रोन' कॅमेऱ्याद्वारे सर्व्हे करण्यात यावा.

शहरातील डीपी प्लॅननुसार शहरातील नैसर्गिक नाले शोधून ते खुले करावेत. त्यासाठी स्वता भेट देऊन नाल्यावरील अतिक्रमणे दूर करावीत. या कारवाईपूर्वी ब्रिटिश कालीन "टोपु शिट'चा वापर करण्यात यावा. ज्या नैसर्गिक नाल्यांवर प्लॉटिंग आणि भाग विकसीत करणे सुरु आहे, अशा ठिकाणी बांधकामास मनाई करावी. नैसर्गिक नाले व बफर झोन मधील अतिक्रमण हटवण्यासाठी व भविष्यात अशा प्रकारे नागरी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर काम करण्यासाठी "टास्क फोर्स' स्थापन करावा. 

नैसर्गिक नाले वळवले गेले आहेत किंवा मूळ नाल्याच्या मापापेक्षा कमी क्षेत्रात नाले स्थापन केले आहेत अशा ठिकाणी आवश्‍यक असलेल्या क्षमतेनूसार नाले रुंदीकरण मोहिम हाती घेऊन पाण्याचा विसर्ग शहराबाहेर काढावा. तसेच शहरातील ड्रेनेज तुंबण्याची कारणे शोधून त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी श्री. साखळकर यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Find natural streams and remove encroachments