Finding lost mobile by traveling a hundred kilometers in solapur
Finding lost mobile by traveling a hundred kilometers in solapur

शंभर किलोमीटरचा प्रवास करुन स्वत:च शोधला हरवलेला मोबाईल

सोलापूर : मूळचे सोलापूरचे व सध्या अमेरिकेत पर्यावरण तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले समीर शहा यांनी नांदेडकडे जाताना प्रवासात हरवलेला महागडा मोबाईल हॅण्डसेट दोन तासांत स्वत: शोधून काढला. यासाठी समीर यांना जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. 

शुक्रवार पेठेत राहणारे डॉ. शीतलकुमार शहा यांचे चिरंजीव समीर शहा हे अमेरिकेत पर्यावरणतज्ज्ञ आहेत. गेल्या आठवड्यात ते कौटुंबिक कामानिमित्त सोलापुरात आले. शनिवारी आई अमिता शहा यांच्यासोबत ते नांदेडमधील नातेवाइकांना भेटण्यासाठी कारने निघाले. हगलूर येथील पेट्रोल पंपावर त्यांनी कार थांबविली. वाहनात डिझेल भरण्याच्या गडबडीत त्यांचा मोबाईल हरवला. पुढे गेल्यानंतर काही वेळाने त्यांना मोबाईल हॅण्डसेट हरवल्याचे लक्षात आले. लागलीच त्यांनी पेट्रोल पंपावर परत येऊन चौकशी केली, पण मोबाईल मिळाला नाही. 

त्यानंतर त्यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात जाऊन मोबाईल हरवल्याची तक्रार नोंदविली. तसेच समीर यांनी अमेरिकेत असलेल्या पत्नी नीलकमल यांनाही मोबाईल हरवल्याचे कळविले. याबाबत मोबाईल कंपनीकडे ऑनलाइन तक्रार नोंदविण्यात आली. कारमध्ये सोबत असलेल्या लॅपटॉपवर समीर यांनी मोबाईलचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. गुगल ट्रॅकिंगद्वारे मोबाईल हॅण्डसेट कोणत्या परिसरात आहे हे त्यांना समजले. समीर यांनी आपला नांदेडचा प्रवास थांबवून मोबाईलच्या लोकेशनचा पाठलाग केला. 

तोवर मोबाईल कंपनीने हॅण्डसेट लॉक करून डाटा सुरक्षित केला. लातूर परिसरातील उजनी गावाच्या जवळ मोबाईलचे शेवटचे लोकेशन दाखविले. त्या लोकेशनचा माग काढत समीर आणि त्यांची आई गावात पोचले. दरम्यान, ज्या व्यक्तीकडे मोबाईल हॅण्डसेट आहे त्या व्यक्तीचा फोटो समीर यांच्या लॅपटॉपवर आला होता. गावात गेल्यानंतर फोटो दाखवून त्या व्यक्तीचा शोध घेतला. काही वेळातच समीर यांचा मोबाईल हॅण्डसेट घेतलेली व्यक्ती सापडली. त्याने 'मी हगलूर येथील पेट्रोल पंपावर गेलो होतो, तिथे मोबाईल सापडला. मी पंपावर याबाबत चौकशी केली पण मोबाईल कोणाचा आहे हे समजले नाही. म्हणून मी मोबाईल घेऊन घराकडे आलो,' असे सांगितले आणि स्वखुशीने मोबाईल परत केला. दुपारी साडेबाराच्या सुमारास हरवलेला मोबाईल अडीच वाजण्याच्या सुमारास समीर यांच्या हातात पडला. यासाठी त्यांना जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. 

मोबाईलमधील ऍप आणि गुगल ट्रॅकरद्वारे मोबाईल हॅण्डसेट शोधण्यास मदत झाली. अलीकडे सर्वच मोबाईलमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. मोबाईलधारकांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. आपला मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर या सुविधेच्या माध्यमातून तो शोधता येतो. 
- समीर शहा, पर्यावरण तज्ज्ञ, अमेरिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com