अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास पालकांनाच दंड 

लुमाकांत नलवडे
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर- 18 वर्षांखालील मुलाने मोठ्या सीसीच्या दुचाकी चालविल्यास पालकांनाही दंड भरावा लागणार आहे. महाविद्यालयांच्या परिसरात अल्पवयीन मुलांकडून 50 सीसीवरील दुचाकींचा सर्रास वापर होत आहे. दुचाकी चालविण्याची त्यांची स्टाइल, स्पीड यामुळे अन्य वाहनचालकांना धोका निर्माण होऊ शकतो. याची गंभीर दखल परिवहन आयुक्तांनी घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसारच ही कारवाई होणार आहे. त्याबाबतचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाला देण्यात आले आहेत. 

कोल्हापूर- 18 वर्षांखालील मुलाने मोठ्या सीसीच्या दुचाकी चालविल्यास पालकांनाही दंड भरावा लागणार आहे. महाविद्यालयांच्या परिसरात अल्पवयीन मुलांकडून 50 सीसीवरील दुचाकींचा सर्रास वापर होत आहे. दुचाकी चालविण्याची त्यांची स्टाइल, स्पीड यामुळे अन्य वाहनचालकांना धोका निर्माण होऊ शकतो. याची गंभीर दखल परिवहन आयुक्तांनी घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसारच ही कारवाई होणार आहे. त्याबाबतचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाला देण्यात आले आहेत. 

शहराच्या प्रमुख ठिकाणी आणि विशेष करून महाविद्यालय परिसरात 18 वर्षांखालील मुलांकडून 50 सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकी चालविल्या जात आहेत. या मुलांकडून दुचाकी रेस करणे, वेगाने चालविणे, कर्कश हॉर्न वाजविणे, अशा पद्धतीचे वर्तन होते. त्याचा परिणाम इतर वाहनचालकांवर होतो. पालकांकडूनच मुलांना अशा पद्धतीची वाहने दिली जात असल्याचे यापूर्वीच्या काही कारवायांतून दिसून आले आहे. त्यामुळे आता वाहन चालविणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही दंड करण्यात येणार आहे. याबाबतचा कायदा आणि नियम दोन्हीही आहेत. तरीही याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात होत नव्हती; मात्र आता त्याची अंमलबजावणी प्रभावी होणार आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक यांच्याकडून या कारवाईची मोहीम सुरू होणार आहे. 

मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये नमूद केल्याप्रमाणे वाहन चालविणाऱ्या 18 वर्षांखालील मुलांसंदर्भात वाहनमालकास शिक्षा करण्याची तरतूद आहे. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 4 पोट कलम (ए) अन्वये सार्वजनिक ठिकाणी 50 सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणाऱ्या व्यक्तीस व कलम 18 अन्वये सार्वजनिक ठिकाणी वीस वर्षांखालील व्यक्तीस व्यावसायिक वाहन चालविण्यास मान्यता नाही. तरीही बिनधास्तपणे अशी वाहने चालविली जात आहेत. यामध्ये मुलींचे प्रमाणही अधिक आहे. त्यांच्यावरही आता कारवाई होणार आहे. 

शिक्षा काय होऊ शकते? 
मोटार वाहन कायद्याच्या कलम 180 मध्ये अठरा वर्षांखालील व्यक्तीने वाहन चालविल्यास वाहन मालकास तुरुंगवास किंवा हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा आहे. कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना आरटीओ कार्यालयास मिळाल्या आहेत. तसेच नागरिकांत जनजागृती करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवालही सादर करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

चौकाचौकात होणार कारवाई 
सणासुदीचे दिवस संपल्यामुळे आता आम्ही कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आजच वाहनांना एलईडी बल्ब लावणाऱ्यांवर कारवाईची मोहीम झाली. आता शाळा-महाविद्यालये सुरू होताच त्या परिसरातही कारवाई करणार आहोत. सध्या काही महत्त्वाच्या चौकांत, तरुणांची गर्दी होते तेथेसुद्धा कारवाई करणार आहोत, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

मोटार वाहन नियम आणि कायद्यानुसार 50 सीसीपेक्षा अधिक क्षमतेचे वाहन अठरा वर्षांखालील मुलांना चालविता येत नाही. अशा मुलांवर कारवाईसाठी चार पथकांद्वारे काम सुरू केले आहे. लवकरच शाळा-कॉलेज परिसरात याबाबत कारवाईची मोहीम होणार आहे. सध्या पथकांद्वारे कारवाई होत आहे. 
- डी. टी. पवार (प्रादेशिक परिवहन अधिकारी)

Web Title: fine for parents

टॅग्स