साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र सादर ; 379 जणांची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

सेव्हन हिल्स रिऍलिटीज प्रा. लि. कंपनीने सोलापुरात नवी पेठेतील मोबाईल गल्लीत 2012 मध्ये कार्यालय सुरू केले. 2012 ते 2015 या कालावधीत कंपनीने पिग्मी योजना, रिकरिंग डिपॉझिट, फिक्‍स डिपॉझिट, कल्याण योजना तयार, दामदुप्पट योजना, मंथली इनकम, सुवर्ण योजना अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक करून घेतली.

सोलापूर : सेव्हन हिल्स रिऍलिटीज प्रा. लि. व सेव्हन हिल्स विविधोशा सोहार्द को-ऑप. लिमिटेड या कंपन्यांनी केलेल्या एक कोटी 28 लाख 78 हजार 857 रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी जिल्हा न्यायालयात साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले. या गुन्ह्यात आजअखेर 379 ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या गुन्ह्यात चार नवीन आरोपींचा समावेश झाला असून, आरोपींची संख्या 16 झाली आहे. 

सेव्हन हिल्स रिऍलिटीज प्रा. लि. कंपनीने सोलापुरात नवी पेठेतील मोबाईल गल्लीत 2012 मध्ये कार्यालय सुरू केले. 2012 ते 2015 या कालावधीत कंपनीने पिग्मी योजना, रिकरिंग डिपॉझिट, फिक्‍स डिपॉझिट, कल्याण योजना तयार, दामदुप्पट योजना, मंथली इनकम, सुवर्ण योजना अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक करून घेतली. विविध योजनांत दीड हजारांहून अधिक सोलापूकरांनी गुंतवणूक केली. गुंतवणुकीचा परतावा न मिळाल्याने संतोष वसंतराव शिर्के यांनी एप्रिल 2017 मध्ये फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली होती. 

या गुन्ह्यात यापूर्वी 12 आरोपी होते. आता या गुन्ह्यात चार नवीन आरोपींचा समावेश झाला आहे. संचालक एन. प्रतिमा (रा. मालूर कर्नाटक), पेनकोंडा चंद्रशेखर अकुला (रा. अनंतपूर, आंध प्रदेश), दसप्पा हनमंतराजू (रा. तुमकूर, कर्नाटक), वाल्मिकी नरसिंम्हलू थिरूमलेश (रा. अनंतपूर, आंध प्रदेश) अशी नवीन आरोपींची नावे आहेत. नऊ आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी सोमवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वाय. जी. देशमुख यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. यात आरोपीतर्फे अॅड. प्रशांत नवगिरे, सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर, मूळ फिर्यादीतर्फे ऍड. जयदीप माने हे काम पाहत आहेत.

Web Title: FIR registered of 4500 pages 379 peoples have complaints