मखरा डोंगरावर 'अग्नितांडव'; मालदाड शिवारातील घटना

हरिभाऊ दिघे
रविवार, 29 एप्रिल 2018

मालदाड व सोनेवाडी शिवारातील मखरा डोंगरावरील वनक्षेत्रास शुक्रवारी सायंकाळी आग लागली. वनक्षेत्रातील गवत, जंगली झाडे-झुडुपे आगीत भस्मसात झाली. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारातील मखरा डोंगराला शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागून अंदाजे बारा हेक्टर 'वनक्षेत्र' जळून खाक झाले. सायंकाळपर्यंत आग धुमसत होती. रात्री नऊच्या सुमारास आग नियंत्रणात आणण्यात यश आले. बारा तास सुरु असलेल्या अग्नितांडवात वनक्षेत्राची मोठी हानी झाली.

मालदाड व सोनेवाडी शिवारातील मखरा डोंगरावरील वनक्षेत्रास शुक्रवारी सायंकाळी आग लागली. वनक्षेत्रातील गवत, जंगली झाडे-झुडुपे आगीत भस्मसात झाली. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनक्षेत्रपाल बी. एल. गीते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. एस. बस्ते, वनरक्षक पी. जे. पुंड, संगीता कोंडार, नियत क्षेत्र अधिकारी संतोष पारधी व वनविभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. दिवसा प्रचंड उन्हाचा तडाखा सुरु असल्याने आग विझविण्यात अपयश आले. सायंकाळपर्यंत वनक्षेत्रात आग धुमसत होती. रात्री नऊवाजेच्या सुमारास आग विझविण्यात यश आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.

आग नियंत्रणात आणण्यासाठी विलास नवले, विपुल नवले, शरद नवले, भाऊराव नवले, नितीन नवले, रभाजी शितोळे, राजेश नवले, बाबासाहेब नवले, अविनाश नवले, रामकुमार गवळी, निलेश नवले, अरुण नवले, जीवन नवले सहित पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. अंदाजे बारा हेक्टर वनक्षेत्रास आग लागल्याचे सांगण्यात आले. वनक्षेत्रास आग कशामुळे लागली, याचे निश्चित कारण समजू मात्र शकले नाही. आगीत गवत, निवडुंग व काही जंगली झाडे जळाली. मोठ्या झाडांचे प्रचंड नुकसान झाले नाही. आगीत वन्यप्राण्याची हानी झाली नाही, मात्र वनक्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे वनपाल एस. एस. बस्ते यांनी सांगितले.

Web Title: fire on maldad shivar nagar district