शिरवळमध्ये दुकान व्यावसायिकावर अज्ञातांचा गोळीबार

अशपाक पटेल
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

खंडाळा (जि.सातारा) : शिरवळ ता.खंडाळा  येथील शिरवळ पळशी रोडवरील दारुचे दुकान (वाईन शॉप) चालकावर शुक्रवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला. नेम चुकल्याने वॉईनशॉप चालक व कामगार बचावले आहेत.

खंडाळा (जि.सातारा) : शिरवळ ता.खंडाळा  येथील शिरवळ पळशी रोडवरील दारुचे दुकान (वाईन शॉप) चालकावर शुक्रवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला. नेम चुकल्याने वॉईनशॉप चालक व कामगार बचावले आहेत.

तसेच घटनास्थळी गोळी झाडल्यानंतर पुंगळी पोलिसांना सापडली आहे. या तपासासाठी पोलिस उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरवळ पोलिस स्टेशनचे पथक रवाना झाले असल्याची माहिती शिरवळ पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल क्षीरसागर यांनी दिली. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली असून पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पोलिस उप विभागीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील व टिके यांनी घटनास्थळी भेट दिली.

शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ-पळशी रोडवर एक वाईन शॉप आहे. वाईनशॉप चालक व तीन कामगार हे शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास हिशोब पूर्ण करुन दुकान बंद करत असताना दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती तेथे आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने दुकानचालक व कामगारांच्या दिशेने पिस्तूलने गोळी झाडली. यावेळी नेम चुकल्याने व गोळीच्या आवाजाने चालक व कामगार सावध झाले. यानंतर दुसरी गोळी झाडण्यासाठीही अज्ञातांनी यावेळी प्रयत्न केले असल्याचे आपल्या फिर्यादीत आकाश कबुले यांनी सांगितले. गोळीबार करणारे दुचाकीवरून शिरवळ बाजूकडे पळून गेले. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अविनाश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार व इतर अधिकारी यांनी धाव घेतली. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरून पुंगळी हस्तगत केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल क्षीरसागर करीत आहे.

Web Title: Firing on Shop Owner in Shirwal