पहिला डाव विजयदादांचा की संजयमामांचा?

mohite-shinde
mohite-shinde

भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेत असलेले माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील. राष्ट्रवादी व भाजपला समान अंतरावर ठेवून जिल्ह्याच्या राजकारणातला सस्पेन्स कायम ठेवलेले जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे. या दोन नेत्यांच्या निर्णयात माढ्याची आणि पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणाची गणिते अडकली आहेत. माढ्यातून लढण्यासाठी भाजपकडे सध्या तरी स्थानिकचा प्रभावी चेहरा नसल्याने उमेदवार आयात करणे किंवा बाहेरचा उमेदवार माढ्यात उभा करणे या शिवाय इतर पर्याय त्यांच्याकडे नाही. राजकीय हिशेबाचा पहिला डाव कोण टाकणार? भाजप की राष्ट्रवादी यातील कोणता झेंडा कोण खांद्यावर घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

माढ्यातून भाजपला जिंकण्यासाठी मोहिते-पाटील किंवा शिंदे या पैकी एका गटाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे माढ्याची निवडणूक जरी वरकरणी राजकीय चिन्हावरची वाटत असली तरीही अंतर्गत मात्र मोहिते-पाटील समर्थक व मोहिते-पाटील विरोधक यांच्यातच हा सामना रंगणार आहे. त्यामुळे माढ्यातून लढण्याची आणि जिंकण्याची स्पर्धा सुरू असताना जिल्हा परिषद संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार शहाजी पाटील, उत्तम जानकर यांच्या समविचाराची गटाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आणि निर्णायक आहे. 

मोदी लाटेत निवडून आलेले खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनाच पुन्हा 2019 ला संधी मिळू शकेल असेच काहीसे वातावरण होते. परंतु याचा भ्रमनिरास मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत झाला. माळशिरस व मोहिते-पाटील समर्थक वगळता इतर तालुक्‍यातील एकाही कार्यकर्त्यांनी किंवा नेत्याने खासदार मोहिते-पाटील यांच्या नावाची शिफारस केली नाही. फलटणवाल्यांनी रामराजे निंबाळकर यांच्या नावाची शिफारस केली. आपण इच्छुक नसल्याचे रामराजे निंबाळकर यांनी सांगितल्याने हे नाव चर्चेत येण्यापूर्वीच बाजूला गेले. माढ्याच्या चर्चेत सुरवातीला प्रभाकर देशमुख आणि आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांचेही नाव राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी पुढे आल्याने माढ्याचा तिढा पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार मोहिते-पाटील यांना माढा, करमाळा, सांगोला तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची कमी-अधिक प्रमाणात मदत झाली होती. त्यानंतर झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आणि नंतर खासदार निधी वापराच्या बाबतीत आलेल्या अनुभवांमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गप्प बसलेले दीपक साळुंखे पत्रकार परिषद घेऊन आपण इच्छुक असल्याचे सांगितल्याने जिल्ह्याच्या राष्ट्रवादीतील पहिली खदखद जगजाहीर झाली आहे. प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीपर्यंत आणखी इतर तालुक्‍यातूनही खदखद बाहेर पडण्याची शक्‍यता आहे. माढा लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते अन्‌ कार्यकर्ते कोणत्याही पक्षात असले तरीही त्यांचे रिमोट कंट्रोल अद्यापही बारामतीच्या गोविंद बागेत आहे हे विशेष. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com