कणेरी मठावर साकारले देशातील पहिले डिव्हाईन गार्डन

कणेरी मठावर साकारले देशातील पहिले डिव्हाईन गार्डन

कोल्हापूर - हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची संस्कृती दर्शविणारे देशातील पहिले डिव्हाईन गार्डन कणेरी (ता. करवीर) येथे साकारत आहे. तब्बल ११ कोटी रुपये खर्चाचे हे गार्डन सहा एकरांत पसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गार्डनचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या सप्ताहात हा कार्यक्रम होण्याची शक्‍यता आहे. 

विविध वनस्पतींबरोबर कोल्हापूरची वैशिष्ट्ये दाखवणाऱ्या छटा या गार्डनची वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे, मठाला भेट देणाऱ्या भाविकांच्या श्रमदानातून हे गार्डन साकारले आहे. याशिवाय देशभरातील कलाकारांनी कलेच्या माध्यमातून गार्डनमधील शिल्पांना आकर्षक बनविण्याचे काम केले आहे. दोन लाख कुंड्यांचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. 

विविध फुलझाडांच्या राशी 
गार्डनमध्ये अधिकाधिकपणे फुलझाडांचा वापर केला आहे. यात बारा वेगवेगळे व्हर्टिकल प्रकार आहेत. कॅकटसचे एक हजार, गुलाबाचे दोन हजार, जास्वंदाच्या १४० प्रकारांसह इतर फुलांचे शेकडो प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत. हजारो प्रकारची विविध रंगीत फुले असणारी ही वेगवेगळी बाग असल्याचा दावा मठाने केला आहे. 

विविध प्राण्यांच्या प्रतिकृती 
देशी गायीची महाकाय ५० फूट उंचीची मूर्ती, बदक, मोर, अष्टविनायक गणपती, विठ्ठल रखुमाई आदींच्या मूर्ती आकर्षकपणा वाढविणाऱ्या ठरणार आहेत. विविध प्रकारचे माठ बनवून त्याला सजवून त्याला स्वर्गीय वातावरणाचे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील प्रत्येक राज्यातील संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूर्तीही बागेत आहेत. 

अनोखा आनंद देणारी जंगल सफारी 
गुहेमध्ये कृत्रिम जंगल तयार करण्यात आले असून, यातून जंगल सफारी नावाची ट्रेन धावणार आहेत. या ट्रेनच्या दोन्ही बाजूला जंगल वसविण्यात आले आहे. यामध्ये गावातील संस्कृती, लोकांची दिनचर्या, कारागीर, विविध ठिकाणी काम करणारे लोक, प्राणी आदींच्या हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या आहेत. ट्रेनसाठी पूलही तयार केला आहे. शिवाय झुलत्या पुलाचा आनंदही घेता येणार आहे. 

अत्याधुनिक ठिबक सिंचनाचा वापर 
बागेतील वनस्पतींना पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात आला आहे. दररोज पावणेदोन लाख लिटर पाणी लागणार आहे. याशिवाय महिन्याला लाख रुपयांची झाडे बदलावी लागणार आहेत. जसे सुचेल, जागा मिळेल तशी कल्पकता बाग तयार करताना वापरली आहे. कोल्हापुरातील भवनी मंडप, पायताणाच्या प्रतिकृतीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विविध भागांतील भाविकांनी श्रमदान करून गार्डनच्या उभारणीला मदत केली. 

दुबईतून सुचली कल्पना 
मठाधिपती काडसिद्धेश्‍वर महाराज दुबईला गेल्यानंतर तिथे गेल्या वर्षी ही कल्पना सुचली. अशा पद्धतीच्या बागा दुबई, सिंगापूरमध्ये पाहावयास मिळतात. आपणाकडे नैसर्गिक विविधता असल्याने आपण अशी बाग तयार करू शकतो. हे लक्षात आल्यानंतर तज्ज्ञांशी चर्चा केली. यानंतर गेल्या फेब्रुवारीत या बागेच्या कामाला सुरवात केली. आता कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही बाग पाहण्यासाठी देशभरातून भाविक यावेत, हा मठाचा प्रयत्न असल्याने श्री काडसिद्धेश्‍वर महाराज यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com