पहिली उचल एकरकमी 3100 रुपये द्यावी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात उसाला एकरकमी 3100 रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्यासाठी बुधवारी (ता. 2) ऊस उत्पादक व शेतमजुरांचा "जागर' मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास शुक्रवारी (ता. 4) तावडे हॉटेल येथे महा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

या वेळी संजय पवार म्हणाले, ""पाच नोव्हेंबरपासून गळीत हंगामास सुरवात होत आहे. ऊस उत्पादन खर्चात नांगरणी, भांगलण, लावण, मजुरी, भरणी, बियाणे, सरकारी पाणीपट्टी, खते, यंत्रसामग्री, वीज यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बाजारात सध्या साखरेचा दर क्विंटलला 3600 रुपये इतका आहे. गतवर्षीची एफआरपी यंदाही तशीच ठेवली आहे. यंदाच्या हंगामात साखरेचा दर व वाढीव उत्पादन खर्च पाहता यंदा उसाला एकरकमी 3100 रुपये पहिली उचल द्यावी, अशी आमची मागणी आहे.

त्यासाठी बुधवारी (ता. 2) साखर संचालक कार्यालयावर जागर मोर्चा काढण्यात येणार असून दुपारी बारा वाजता बिंदू चौक येथून मोर्चाला प्रारंभ होईल. मोर्चात ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. पहिली उचल आणि अन्य मागण्यांसंबंधी राज्य शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास शिवसेनेतर्फे शुक्रवारी (ता. 4) तावडे हॉटेल येथे दुपारी बारा वाजता महा रास्ता रोको केले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. उसाची एकरकमी 3100 रुपये पहिली उचल मिळावी, यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

या वेळी शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, तानाजी आंग्रे, संभाजी भोकरे, सुजित चव्हाण, रवी चौगुले आदी उपस्थित होते.

सहकारमंत्र्यांवर टीका
ज्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घ्यायचे त्यांचाच आवाज कमी झाला आहे. शिवसेना तडजोड करणार नाही. आंदोलन करणारे आता गप्प का, अशी टीकाही खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर करण्यात आली.

Web Title: First installment should Rs. 3100 for sugarcane