अगोदर कर्ज, नंतर सभासद! लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेतील प्रताप

संजय काटे
शुक्रवार, 6 जुलै 2018

श्रीगोंदे (नगर) : लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेने चार शेतकऱ्यांना दिलेल्या पीककर्जाची चौकशी पूर्ण झाली. हे शेतकरी लोणीचे असताना, त्यांनी येळपणे येथील जमिनींचे बोगस उतारे जोडून सव्वाचार लाखांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज नियमबाह्य पद्धतीने वितरित केले असून, त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांसह संस्थेचे संचालक मंडळ, जिल्हा सहकारी बॅंकेच्या मढेवडगाव शाखेला जबाबदार धरण्यात आले आहे. 

लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेचे सभासद राजेंद्र काकडे यांनी याबाबत सहायक निबंधकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी बी. के. शिवरकर यांना तपासी अधिकारी नेमले. त्यांनी याबाबतचा अहवाल नुकताच सादर केला. 

तक्रारीत काकडे यांनी म्हटले होते, की लोणी व्यंकनाथ सेवा संस्थेने कार्यक्षेत्राबाहेरील चार शेतकऱ्यांना सभासद केले. विशेष म्हणजे, त्यांना कर्जमंजुरी 22 मार्च रोजी दिली व त्यानंतर दोन दिवसांनी सेवा संस्थेने त्यांना सभासद केले. अगोदर कर्ज व नंतर सभासद, अशी ही पद्धत झाली. शिवाय त्यांनी येळपणे येथील जमिनीचे जे पुरावे जोडले होते, तेही बनावट असल्याचा आरोप काकडे यांनी केला होता. 

चौकशीत काकडे यांचे बहुतेक आरोप योग्य असल्याचे स्पष्ट झाले. येळपणे येथील जोडलेले फेरफार उतारे विसंगत असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. मुळात सेवा संस्थेला कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तीस सभासद करताच येत नाही. शिवाय कर्जवितरणापूर्वी जिल्हा बॅंकेची परवानगी घेतलेली नाही. कर्ज मंजूर झाल्यानंतर बॅंकेतून ते सभासदांच्या खात्यावर वर्ग होते. येथे मात्र थेट बॅंकेने परस्पर त्या लोकांना दिले. तक्रारी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी व्याजासह कर्जाची रक्‍कम संस्थेत भरली. मात्र, संस्थेनेही काही दिवस त्याचा भरणा न करता वापरल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. कर्जाचा बोजा शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर दिसत नसल्याने सगळेच गौडबंगाल असल्याचे प्रथमदर्शनी मान्य झाले आहे. 

नियमबाह्य पद्धतीने या चार शेतकऱ्यांना कर्ज दिल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे लोणी व्यंकनाथ सेवा संस्था संचालक मंडळ व सचिव, तसेच मढेवडगाव सहकारी बॅंकेतील अधिकाऱ्यांना "कारणे दाखवा' नोटिसा काढून नंतर कारवाई ठरविली जाईल. 
- रावसाहेब खेडकर, सहायक निबंधक, श्रीगोंदे 

Web Title: first loan then member in loni vyankanath seva sanstha