चंद्रभागा नदीवर घाट जोडणीचा पहिला टप्पा सुरू 

चंद्रभागा नदीवर घाट जोडणीचा पहिला टप्पा सुरू 

पंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था आणि तुकाराम महाराज संतपीठाची निर्मिती ही दोन कामे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून केली जाणार आहेत. परंतु त्यासाठी शासन स्तरावर पाठपुराव्याची गरज आहे. वन विभागाच्या माध्यमातून सुंदर अशा तुळशीवन उद्यानाची तर मंदिर समितीकडून सुसज्ज भक्त निवासाची उभारणी झाली आहे. नदीच्या पैलतीरावर इस्कॉनने देखणा प्रभुपाद घाट बांधला असून पाटबंधारे विभागाकडून चंद्रभागा नदीवरील घाट जोडणीचे पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर पंढरपूरच्या वैभवात भर पडणार आहे. 

आषाढी, कार्तिकी यात्रांप्रमाणेच अलीकडे दर महिन्याच्या एकादशीला लाखोंच्या संख्येने भाविक येऊ लागले आहेत. सुटीच्या काळात देखील पंढरपुरात भाविकांची एकच गर्दी होते. धार्मिक पर्यटन वाढल्यामुळे पंढरपूरच्या अर्थकारणाला फायदा होत आहे. पंढरपूरला जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर पंढरपूरला कमी वेळात भाविक येऊ शकतील आणि साहजिकच पंढरपुरातील गर्दी आणखी वाढेल. या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरात मंदिर समिती आणि शासन स्तरावरील काही कामे वेगाने होणे गरजेचे आहे. 

पाठपुराव्याची गरज 
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌ तास रांगेत उभा राहावे लागू नये, यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर दर्शनाची टोकन पद्धतीची व्यवस्था केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी जाहीर केलेले आहे. परंतु त्यासाठी आवश्‍यक प्राथमिक सुविधा नसल्याने अशी व्यवस्था होण्यास विलंब लागत आहे. पत्राशेडजवळ कायमस्वरूपी नवीन दर्शन मंडप बांधून तिथे भाविकांना सर्वप्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. सध्या चंद्रभागा घाटापर्यंत असलेला उड्डाणपूल (स्काय वॉक) वाढवून तो पत्राशेडजवळील प्रस्तावित नवीन दर्शन मंडपापर्यंत आणून जोडला जाणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर तिरुपतीच्या धर्तीवर रेल्वे स्थानक, एसटी स्थानकासह शहरात अनेक ठिकाणी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठीचे टोकन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. उड्डाणपूल आणि दर्शन मंडपाचे आराखडे बनवण्यात आणि त्यासाठीच्या परवानग्या घेण्यात बरेच महिने लोटून गेले आहेत. हे काम वेगाने होण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. 

तुकाराम महाराज संतपीठ 
श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या कायद्यातच तुकाराम महाराज संतपीठाची स्थापना करण्याविषयी नमूद केलेले आहे, परंतु आजपर्यंत संतपीठ उभा राहू शकलेले नाही. सध्याच्या मंदिर समितीने पर्यटन विकास महामंडळाच्या भक्त निवासाच्या जागेवर हे संतपीठ उभा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. संतपीठाचे संकल्पचित्र तयार करण्यात आले आहे. पर्यटन विभाग आणि मंदिर समितीच्या माध्यमातून हे संतपीठ उभारण्याचा प्रस्ताव आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील संतपीठास तत्त्वतः मंजुरी दिली असल्याचे सांगितले जात आहे, परंतु अद्याप संतपीठाच्या कामास सुरवात झालेली नाही. संतपीठाची उभारणी झाल्यास पंढरपूरचे महत्त्व आणखी वाढणार आहे. संतपीठाच्या निर्मितीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, परंतु या समितीची अनेक महिन्यांत बैठक देखील झालेली नाही. त्यामुळे मंदिर समितीच्या अध्यक्षांनी या संदर्भातील घोषणा केली असली तरी दुर्दैवाने वर्षभरात या संदर्भात ठोस काहीही झालेले नाही. भाविकांच्या राहण्याची सोय व्हावी यासाठी मंदिर समितीने सुमारे 80 कोटी रुपये खर्च करून सुसज्ज आणि देखणे असे भक्त निवास बांधले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य भाविकांना या भक्त निवासमधील दर परवडत नाही हे लक्षात घेऊन तेथील दर कमी करण्याचा विचार होणे आवश्‍यक आहे. 

घाटांचे सुशोभीकरण 
चंद्रभागा नदीच्या तीरावरील सर्व घाट एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात विप्रदत्त घाट ते उद्धव घाट या दरम्यानचे काम पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी घडीव काळा पाषाण वापरण्यात येत आहे. सध्या चंद्रभागा घाट, कासार घाट, महाद्वार घाट, कुंभार घाट, दत्त घाट या पाच घाटांचे बांधकाम वेगात सुरू आहे. त्यानंतर पुढील घाट जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामाशिवाय भक्तराज श्री पुंडलिक मंदिर आणि लगतच्या मंदिराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. 

पैलतीराची शोभा वाढली 
इस्कॉनच्या माध्यमातून नदीच्या पैलतीरावर प्रभुपाद घाट बांधण्यात आला आहे. या घाटामुळे नदीच्या पैलतीराची शोभा वाढली असून या घाटामुळे भाविकांची चांगली सोय झाली आहे. तेथील मंदिर आणि परिसर रमणीय झाला आहे. पंढरपूरला आलेल्या प्रत्येकाने तुळशी वृंदावन उद्यान, नदीच्या पैलतीरावरील इस्कॉनचे मंदिर आणि तेथील प्रभुपाद घाटास आवर्जून भेट देण्यासारखे हे ठिकाण झाले आहे. 

तुळशी वृंदावन उद्यान 
वन विभागाच्या माध्यमातून वन आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तुळशी वृंदावन उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. येथील यमाई तलावालगत उभारण्यात आलेल्या या उद्यानासाठी सुमारे चार कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. पंढरपुरातील ते एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ झाले आहे. स्थानिक नागरिक, वारकरी आणि पर्यटकांची तिथे गर्दी होत आहे. 

...
श्री विठ्ठल-त्ररुक्‍मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिरुपतीच्या धर्तीवर दर्शनासाठी टोकनपद्धत सुरू करण्यासाठी दर्शन हॉल बांधण्यात येणार असून उड्डाणपुलाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. ते झाल्यावर टोकनपद्धत सुरू करणे शक्‍य होईल. पर्यटन विभागाच्या जागेवर संतपीठ उभारले जाणार असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- डॉ. अतुल भोसले, अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती 


शहरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रेक्षणीय स्थळाची गरज होती. शहरातील यमाई तलावालगत वन विभागाच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा तुळशी वृंदावन उद्यानाची उभारणी झाली आहे. दररोज शेकडो पर्यटक आणि स्थानिक नागरिक हे तुळशी उद्यान पाहण्यासाठी जात आहेत. अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आमदार प्रशांत परिचारक यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता. 
- साधना भोसले, नगराध्यक्षा 


श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या कायद्यातच संत तुकाराम संतपीठ स्थापन करावे, अशी तरतूद केलेली आहे. त्यामुळे संत तुकाराम विद्यापीठ पंढरपुरात होणे आवश्‍यक आहे. सर्व संतांनी विठ्ठलाला आपले दैवत मानलेले आहे. हे विद्यापीठ केवळ डिग्री देणारे असू नये. या विद्यापीठातून उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक निर्माण व्हावेत, संत वाङ्‌मयाचा अभ्यास आणि संशोधन व्हावे. 
- वा. ना. उत्पात, भागवताचार्य 

चंद्रभागा नदीवरील घाट सुशोभीकरणाच्या कामाच्या अंतर्गत सध्या 359 मीटर घाट जोडणीचे काम पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील हे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील काम वेगाने पूर्ण केले जाणार आहे. हे सर्व काम पूर्ण झाल्यावर घाटाचे सौंदर्य वाढणार आहे. 
- सचिन ढोले, प्रांताधिकारी 

दर्शनासाठी सध्या असलेल्या उड्डाणपुलाला जोडून नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. नवीन उड्डाणपुलाचा आणि दर्शन मंडपाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच उड्डाणपुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून हे काम वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. समितीच्या माध्यमातून प्रस्तावित असलेली अन्य कामे देखील वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. 
- सुनील जोशी, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com