प्रथमच राष्ट्रवादीला उपसभापतिपद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

सांगोला - शेकापने सांगोला पंचायत समितीवरील गेल्या 40 वर्षांतील वर्चस्व कायम ठेवत या वेळी प्रथमच राष्ट्रवादीला उपसभापतिपद देऊन बरोबर घेतले आहे. या निवडीच्या वेळी विरोधी पक्ष महायुतीला चार जागा मिळाल्या. पण विकासकामे करण्यासाठी सभापती व उपसभापती निवडी बिनविरोध करण्यास त्यांनी मदतच केली. 

सांगोला - शेकापने सांगोला पंचायत समितीवरील गेल्या 40 वर्षांतील वर्चस्व कायम ठेवत या वेळी प्रथमच राष्ट्रवादीला उपसभापतिपद देऊन बरोबर घेतले आहे. या निवडीच्या वेळी विरोधी पक्ष महायुतीला चार जागा मिळाल्या. पण विकासकामे करण्यासाठी सभापती व उपसभापती निवडी बिनविरोध करण्यास त्यांनी मदतच केली. 

सांगोला पंचायत समितीवर गेल्या 40 वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत तर शेकाप, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडीच्या माध्यमातून काम केले व तालुक्‍यातील ग्रामीण भागात विकासकामे केली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये शेकापने राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आघाडी करून निवडणूक लढविली. यात शेकापने आठ जागा व राष्ट्रवादीने दोन अशा 10 जागा मिळवत पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व अबाधित ठेवले तर कधी नव्हे ते तालुक्‍यात कायम विरोधकांची भूमिका बजावणारे माजी आमदार ऍड. शहाजीबापू पाटील यांनी सर्व मित्रपक्षांना एकत्र करून महायुती करून पहिल्यादांच पंचायत समितीमध्ये चार जागा मिळवून भक्कम विरोधी पक्षाची ताकद दाखविली. तालुक्‍याच्या विकासासाठी सभापती व उपसभापती निवडीच्या वेळी विरोधकांनी नमती भूमिका घेत या निवडी बिनविरोध करण्यास उपस्थित राहून सहमतीच दिली आहे. 

आमदार गणपतराव देशमुख व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी तालुक्‍याचा समतोल राखावा या उद्देशाने घेरडी गटातील सोनद पंचायत समिती गणातील मायाक्का यमगर यांना सभापतिपद दिले तर कडलास गणातील शोभा खटकाळे यांना उपसभापतिपद दिले. तसेच नाझरा गणातील श्रुतीका लवटे यांना पुढील काही वर्ष सभापती देण्याचेही ठरले आहे. तसेच त्यानंतर जवळा गणातील सरिता साळखे यांनाही सभापतिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सभापती व उपसभापती निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदर देशमुख, दीपक साळुंखे, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. 

Web Title: first time NCP deputy presidential