‘सावली’मध्ये उभारणार देशातील पहिला वॉटर थेरपी टॅंक

‘सावली’मध्ये उभारणार देशातील पहिला वॉटर थेरपी टॅंक

कोल्हापूर - पॅरालिसिस, कोमा, फ्रॅक्‍चर, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, मतिमंदत्व, स्किझोफ्रेनिया, अल्झायमर्स आदी व्याधींनी अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी लोकसहभागातून प्रकल्प साकारला जात आहे. जूनअखेर बांधकाम पूर्ण होऊन हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून, भारतातील पहिला वॉटर थेरपी टॅंक येथे उभारला जाणार आहे.

कमरेखालचा भाग लुळा असणाऱ्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धती वरदान ठरणार आहे. सध्या अशा पद्धतीचे टॅंक फक्त अमेरिका, युरोप, चीन येथेच उपलब्ध आहेत. 

संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रात अशा पद्धतीचे काम गेली तेरा वर्षे करणारी सावली केअर सेंटर ही एकमेव संस्था असून, चाळीस ते पंचेचाळीस टक्के रुग्णांना पूर्ण मोफत किंवा सवलतीच्या दरात संस्थेमध्ये दाखल करून घेतले जाते. सध्या संभाजीनगरातील नाळे कॉलनी येथे संस्थेचे काम सुरू आहे. तेथे ८५ हून अधिक रुग्ण सेवेचा लाभ घेत आहेत. संस्थेसाठी वाडी पीर येथे सहा हजार चौरस फुटांची जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध झाली असून, तेथे प्रकल्पाच्या बांधकामाला प्रारंभ झाला आहे. किमान दीडशे रुग्णांची सोय असणारा वॉर्ड, रुग्णांच्या गरजेप्रमाणे रुग्णांना स्पेशल, कपल रूम्स, जनरल वॉर्डची सोय, इंटरकॉम कनेक्‍शन, सीसीटीव्ही आदी सुविधांचा प्रकल्पात समावेश असेल. अद्ययावत फिजिओथेरपी युनिट, सर्व इमर्जन्सी उपकरणांसह सज्ज क्रिटीकल केअर युनिट, रुग्णांच्या मनोरंजनासाठी लायब्ररीसह मल्टिपर्पज हॉल, योगा सेंटर, ध्यान मंदिर, मॉच्युरीची सुविधाही या प्रकल्पात असेल. 

आजवर संस्थेच्या सेवेचा लाभ अकराशेहून अधिक रुग्णांनी घेतला असून, त्यापैकी पाऊणे पाचशेहून अधिक रुग्णांना पूर्णपणे मोफत व सवलतीच्या दरात संस्थेने सेवा दिली आहे. सजीव अभियानांतर्गत फाऊलर बेड, व्हील चेअर, कमोड चेअर, वॉटर बेड, एअर बेड, कुबड्या, वॉकर, नेब्युलायझर, सक्‍शन मशीन, बेड पॅन आदी साहित्य रुग्णांना मर्यादित कालावधीसाठी पूर्णपणे मोफत दिले जाते. पुण्याचे प्रसिद्ध फिजीओथेरपीस्ट डॉ. श्रीधर चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर थेरपीचे व्याम संस्थेने सुरू केले असून, पुण्यानंतर महाराष्ट्रात अशा पद्धतीची सेवा फक्त सावली केअर सेंटरमध्येच उपलब्ध आहे. 

परावलंबित्व हाच निकष
परावलंबित्व या एकमेव निकषावर रुग्णांना संस्थेत दाखल करून घेतले जाते. काही रुग्ण डे केअर बेसीसवर आणि काही बरे होईपर्यंत येथील सेवेचा लाभ घेतात. अद्ययावत उपकरणांसह डॉक्‍टर्स आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम त्यासाठी कार्यरत आहे. संस्थेची आजवरची सर्व वाटचाल कोणत्याही सरकारी मदत किंवा अनुदानाशिवाय सुरू आहे. त्यामुळे केवळ लोकसहभागातूनच हा प्रकल्प साकारला जात असून, अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.sawalicares.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रकल्प संचालक किशोर देशपांडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com