आंधळीत "बायोफ्लॉक' तंत्राद्वारे आधुनिक पध्दतीने मत्स्यपालन

शामराव गावडे 
Monday, 12 October 2020

आंधळी (ता. पलूस) येथील प्रथमेश माने यांनी "बायोफ्लॉक' तंत्राद्वारे आधुनिक पध्दतीने मत्स्यपालन सुरु केले आहे.

नवेखेड : आंधळी (ता. पलूस) येथील प्रथमेश माने यांनी "बायोफ्लॉक' तंत्राद्वारे आधुनिक पध्दतीने मत्स्यपालन सुरु केले आहे. अवघ्या तीन गुंठ्यातील बारा तळ्यांमधून एका तळ्यातून वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपयांच्या कमाईची अपेक्षा आहे. सुमारे दहा ते बारा लाखांच्या भांडवली गुंतवणुकीतून शेतीपूरक उद्योग म्हणून याकडे पाहता येईल. 

ते म्हणाले, "" याविषयी काही व्हिडिओ पाहिल्यानंतर असं काही करण्याची उर्मी आली. त्यानंतर दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार या ठिकाणी प्रत्येकी आठ दिवसाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर स्वतःच्या शेतीत हा प्रकल्प सुरु केला. यामध्ये गोलाकार 12 टॅंक बनवले आहेत. शेततळ्यांसाठी वापरला जाणाऱ्या प्लास्टीक कागद, विद्युत पंप, शेडनेट अशा साधनांसह सुमारे तीन गुंठ्यात हा प्रकल्प साकारला जातो. सुमारे आठ ते दहा वर्षांसाठी ही गुंतवणूक आहे. सुमारे चार फुट खोली आणि चार मीटर व्यासाच्या या टॅंकमध्ये पंधरा हजार लिटर पाण्याची साठवण क्षमता आहे. 

जितके टॅंक मोठे तितके चांगले आणि माशांचा आकार मोठा होतो. त्यात विविध प्रजातीच्या माशांची पैदास सुरु केली. पाण्यात पुरेसा ऑक्‍सिजन पुरवठा व्हावा यासाठी तीन अश्वशक्तीच्या विद्युत पंपाद्वारे हवेतील ऑक्‍सिजन ओढून त्यात सोडला जातो. त्यामुळे कमी काळात माशांची जास्त वाढ होते. प्रत्येक टॅंकमध्ये सुमारे दीड हजार माशांची निर्मिती होते. माशांच्या विष्टेपासून बॅक्‍टेरिया त रूपांतर करून तेच माशांना खाद्य म्हणून दिले जाते.त्यामुळे खाद्याचा पन्नास टक्के खर्च कमी येतो. 

सहा महिन्यानंतर प्रति टॅंक मधून सहाशे ते सातशे किलो चांगल्या प्रतीचे मासे तयार होतात. दिवसभरात सकाळ संध्याकाळ तास दिड तास वेळ दिला तर देखभाल होते. शेतीला अशा पुरक व्यवसायांची जोड गरजेची आहे. सध्या बीज निर्मितीकडेच लक्ष दिले आहे. बाजारपेठेतून मिळणारा कमीत कमी दर आणि खर्च वजा जाता वर्षाकाठी चांगली कमाई होईल.'' 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fisheries in a modern way through the "bioflock" technique