माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

परशुराम कोकणे
गुरुवार, 9 जानेवारी 2020

सिल्व्हर, कॉमन कार्फ, चिलापी यासह अन्य प्रजातीचे मासे हैदराबाद, कोलकता येथील बाजारपेठेत पाठविले जात आहेत. कोलकता येथून सोलापूरचा कटला प्रजातीचा मासा मिडल ईस्ट प्रांतातील देशांमध्ये जात आहे. 

सोलापूर : शहरापासून जवळ असलेल्या होटगी तलावात यंदा भरपूर पाणी असल्याने मासेमारी जोरात सुरू आहे. येथील माशांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा बाहेर जास्त मागणी आहे. सिल्व्हर, कॉमन कार्फ, चिलापी यासह अन्य प्रजातीचे मासे हैदराबाद, कोलकता येथील बाजारपेठेत पाठविले जात आहेत. कोलकता येथून सोलापूरचा कटला प्रजातीचा मासा मिडल ईस्ट प्रांतातील देशांमध्ये जात आहे. 

हेही वाचा : पुन्हा इथे आलात तर जिवंत ठेवणार नाही..!

56 मच्छीमार कुटुंबांना रोजगार
होटगी परिसरातील हाजी फरदीन बाबा मच्छीमार संस्थेचे 56 सभासद आहेत. या संस्थेने होटगी तलावातील मासेमारीचा ठेका घेतला आहे. मौला गायकवाड हे चेअरमन आहेत तर आडव्यप्पा जाधव हे सेक्रेटरी आहेत. या संस्थेच्या माध्यमातून होटगी आणि परिसरातील 56 मच्छीमार कुटुंबांना रोजगार मिळाला आहे.

Image may contain: 6 people, people smiling, people standing, child and outdoor

मासेमारीचा कालावधी
मासेमारीचा व्यवसाय वर्षभर चालत नाही. डिसेंबर ते मे या कालावधीत तलावात मासे असतात. ट्रकचे ट्यूब पाण्यात सोडून मच्छीमार तरुण सकाळी लवकर तलावात उतरतात. तलावात आतपर्यंत जाऊन जाळे टाकले जाते. जाळ्यात सापडलेले मासे पोत्यात एकत्रित केले जातात. किनाऱ्यावर आल्यानंतर पोत्यातील माशांचे वजन केले जाते. त्यानंतर बर्फ असलेल्या बॉक्‍समध्ये माशांना भरले जातात. त्यानंतर मागणीप्रमाणे या माशांना बाजारपेठेत पाठविले जाते. 

हेही वाचा : अन्‌ वकिलाने वाढदिवसाला घेतलेली सायकल काढली बाहेर!

जुन्याच पद्धतीने मासेमारी
तलावाची खोली जवळपास 10 फूट असल्याने या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा वापरून मासेमारी करणे शक्‍य नाही, त्यामुळे जुन्याच पद्धतीने मासेमारी सुरू असल्याचे तरुणांनी सांगितले. हॉटेल आणि ढाब्यावर कटला प्रजातीच्या माशांना सर्वाधिक मागणी आहे. 

Image may contain: one or more people and outdoor

माशांच्या प्रजाती आणि किलोचे दर
- सिल्व्हर : 50 रुपये 
- चिलापी : 50 रुपये 
- कटला : 70 रुपये 
- रेऊ : 40 रुपये 
- कॉमन कार्फ : 80 रुपये 
- मरळ : 180 रुपये 
- मिरगल : 50 रुपये 

बाजारपेठेचा अभ्यास
तलाव परिसरात भेटलेल्या मच्छीमार कुटुंबातील महिबूब शेख या तरुणाने मासेमारीच्या व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी एमबीएचे शिक्षण घेतल्याचे सांगितले. एमबीए शिक्षण केल्यामुळे बाजारपेठेचा अभ्यास करून त्याप्रमाणे माल पाठवला जात असल्याचे महिबूब यांनी सांगितले. 

Image may contain: outdoor and water

या आहेत मच्छीमारांच्या मागण्या 
- तलाव परिसरात स्वच्छता ठेवावी. 
- मासेमारी करणाऱ्यांना शेतकऱ्यांप्रमाणे सवलती मिळाव्यात. 
- घरकुल योजनेतून घरे मिळावीत. 
- मे ते डिसेंबर या कालावधीत पर्यायी रोजगार मिळावा. 

पाणी भरपूर असल्याने होटगी तलावात सध्या मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध आहेत. होटगी तलावातील मासे हैदराबाद, कोलकता, पुणे, मुंबई, विजयपूर, कलबुर्गी, हुबळी, नाशिक, इंदापूर, उस्मानाबाद येथील बाजारात जातात. तेथील बाजारपेठेत या माशांना चांगला दर मिळतो. सोलापुरातील स्थानिक बाजारात या माशांना अपेक्षित दर मिळत नाही. शेतकऱ्यांप्रमाणे मासेमारांनाही शासनाकडून सवलती मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. दोन किलोच्या पुढे वजन असलेल्या कटला माशाला मिडल ईस्ट प्रांतामध्ये मागणी आहे. त्यामुळे होटगी तलावातील कटला प्रजातीचे मासे कोलकता येथून परदेशातही जातात. 
- महिबूब शेख, 
मच्छीमार तरुण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fishing business at solapur