पाचशे शेतकऱ्यांना  मिळाले फळ विम्याचे पाच कोटी रुपये 

प्रमोद बोडके
रविवार, 1 डिसेंबर 2019

 

  • एसबीआय, सांगोला : 5 कोटी 33 लाख रुपये 
  • एचडीएफसी, सांगोला : तीन लाख रुपये 
  • बॅंक ऑफ इंडिया, सोनके : 4 लाख दोन हजार रुपये
  • युनियन बॅंक, पंढरपूर : 19 लाख लाख रुपये 

सोलापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यातील पिक व फळबाग विम्यासाठी शेतकरी मोर्चे काढतात, उपोषण करतात. शेतकऱ्यांसाठी राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्तेही मैदानात उतरतात. या सर्व पर्यायांवर सोलापूर जिल्ह्याने मात केली आहे. प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्याने पुढाकार घेतला तर जटिल प्रश्‍नही सुटू शकतात याचे उत्तम उदाहरण सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील तब्बल 502 शेतकऱ्यांना फळपिक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. भोसले यांच्या पुढाकारातून 5 कोटी 78 लाख रुपये अखेर मिळाले आहेत. 

हेही वाचा : ज्येष्ठ नागरिकांना या शहरात दिलासा 

जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांनी 117 कोटी रुपयांचा फळविमा उतरविला

द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक म्हणून सोलापूरची राज्यात ओळख आहे. हवामान आधारित फळविमा योजनेतून 2018 च्या मृग बहारात जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांनी 117 कोटी रुपयांचा फळविमा उतरविला. या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला. जिल्ह्यातील जवळपास 502 शेतकऱ्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे अशा शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम बॅंकेने कपात केली परंतु विमा कंपनी टाटा एआयजीकडे जमा केली नाही. या शेतकऱ्यांना विमा कंपनीही दाद देत नव्हती आणि बॅंक विमा कंपनीकडे बोट दाखवत असल्याने शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायला सुरवात केली. 

हेही वाचा : वाढदिवस साजरा करण्याचे यांचे आदर्श उदाहरण 

दिलेल्या आदेशाचा पाठपुरावा

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विमा योजनेसाठी तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर समितीच्या माध्यमातून या प्रश्‍नाला वाचा फोडण्यात सोलापूर जिल्ह्याला यश मिळाले आहे. शेतकऱ्यांची कोणतीही चुकी नसताना शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बॅंकेवर गुन्हे दाखल करण्याची आणि त्यांच्याकडून व्याजासहित पैसे वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतलेल्या निर्णयाचा व दिलेल्या आदेशाचा पाठपुरावा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज हास्य फुलले आहे. 

हेही वाचा : गाव पुढारी लागले कामाला 

आकडे बोलतात... 
शेतकऱ्यांना मिळालेला विम्याचा लाभ 
* एसबीआय, सांगोला : 5 कोटी 33 लाख रुपये 
* एचडीएफसी, सांगोला : तीन लाख रुपये 
* बॅंक ऑफ इंडिया, सोनके : 4 लाख दोन हजार रुपये 
* युनियन बॅंक, पंढरपूर : 19 लाख लाख रुपये 
* बॅंक ऑफ बडोदा : 18 लाख 16 हजार रुपये 
* युनियन बॅंक, कुर्डुवाडी : 89 हजार रुपये 
-

कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी
शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळाले पाहिजेत. दोन वर्षांपासून नैसर्गिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आम्ही प्राधान्य दिले. समन्वय आणि संवादातून अनेक प्रश्‍न सुटतात. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शेतकरी, बॅंक अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यासोबत बैठक घेऊन सर्वांना समोरासमोर आणून हा प्रश्‍न सोडविण्यात आम्हाला यश मिळाले. ज्या प्रकरणात बॅंका आणि विमा कंपन्या ऐकत नाहीत अशा वेळी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याची तयारीही आम्ही ठेवली होती. 
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five hundred farmers got Rs 5 crore of fruit insurance