मोबाईल गेम सारखं कारनं दिली धडक..!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

मोबाईल गेममध्ये ज्याप्रमाणे समोरील वाहनाला धडक दिली जाते, अगदी तसेच भरधाव कारने दुचाकी, कार आणि रिक्षाला धडक दिली.

सोलापूर - मोबाईल गेममध्ये ज्याप्रमाणे समोरील वाहनाला धडक दिली जाते, अगदी तसेच भरधाव कारने दुचाकी, कार आणि रिक्षाला धडक दिली. हा अपघात सोमवारी रात्री 10च्या सुमारास सात रस्ता परिसरातील सुरभी हॉटेलसमोर घडला. या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नीसह पाच जण जखमी आहेत. धडक देणाऱ्या कारचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

विजय भीमण्णा दौलताबाद (वय 54), अनुराधा विजय दौलताबाद (वय 48, दोघे रा. भालेराव बिल्डिंग, मॉडर्न शाळेसमोर, सोलापूर), चंद्रशेखर कायणप्पा सावळगी (वय 42, रा. आंदेवाडी, ता. दक्षिण सोलापूर), जगदीश उपासे (वय 50), सिद्धांत उपासे (रा. सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. विजय दौलताबाद हे शुद्धीवर आहेत, तर अनुराधा दौलताबाद आणि चंद्रशेखर सावळगी हे दोघे बेशुद्ध आहेत. उपासे पिता-पुत्राला मुका मार लागला आहे. 

सात रस्त्यावरून गांधीनगरच्या दिशेने निघालेल्या कारने (एचएच12 एचव्ही 7461) सुरभी हॉटेलसमोर आल्यानंतर आधी कारला (एमएच 01 एएक्‍स 5110) धडक दिली. त्यानंतर रिक्षाला (एमएच 13 ए 8461) आणि मग दुचाकीला (एमएच 13 सीआर 9868) धडक दिली. अपघातानंतर भरधाव कार दुभाजकाला धडकून वर चढली. अपघातग्रस्त कार आणि रिक्षाची मागील बाजू फुटली आहे. तर दुचाकीचे मागील चाक निखळले आहे. अपघातानंतर रिक्षाचालक वजीर बागवान यांनी जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात नेले. इकडे अपघातस्थळावर बघ्यांची गर्दी जमली. काही वेळांतच पोलिसही दाखल झाले. धडक देणाऱ्या कारचालकास पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस चौकीत नेले. अपघातास कारणीभूत ठरलेली कार वाहतूक शाखेच्या क्रेनने काढून नेली. 

सात रस्ता येथून गांधीनगरकडे भरधाव वेगाने कार निघाली होती. तिच्या मागचे एक चाक पंक्‍चर होते. तरीही चालक नागमोडी व भरधाव वेगाने कार चालवत होता. माझ्या दुचाकीलाही कट मारून कार पुढे गेली. पुढे जाऊन कार सुरभी हॉटेलशेजारील कार, रिक्षा, दुचाकी व चार जणांना धडकली. कार इतक्‍या भयानक वेगात होती, की व्हीडीओ गेममधील कार रेसपेक्षाही थरारक अनुभव मी पहिल्यांदाच प्रत्यक्षात घेतला, असे प्रत्यक्षदर्शी हाजी खलिल विजापुरे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

मुलगा सिद्धांतसह सुरभी हॉटेलमध्ये जेवण करून दुचाकीने निघालो होतो. इतक्‍यात मागून रिक्षा व कारला धडकत कार आमच्या दुचाकीला धडकली. मी व मुलगा खाली पडलो. ज्या रिक्षाला कार धडकली त्याच्या खाली मुलगा आला होता. मला व मुलालाही मुका मार लागला आहे. दारुड्या चालकामुळे आमचा जीव गेला असता. पुढे जाऊन कार रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. 
- जगदीश उपासे 

आसरा चौक येथून प्रवासी घेऊन सात रस्त्याच्या दिशेने निघालो होतो. सुरभी हॉटेलजवळ कारच्या अपघातातील जखमी विव्हळत पडले होते. रिक्षातील प्रवाशांना उतरवलं व दुचाकीवरील जखमी दाम्पत्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. महिलेला जबर मार लागल्यामुळे ती रक्तबंबाळ झाली होती. 
- वजीर बागवान, रिक्षाचालक

Web Title: five injured in accident