जिल्ह्यात साडेपाच लाख शेतकऱ्यांना फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आजअखेर चार लाख 28 हजार हेक्‍टर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात साडेपाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसला आहे

नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आजअखेर चार लाख 28 हजार हेक्‍टर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात साडेपाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 

ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात तब्बल 200 मिलिमीटर असा उच्चांकी पाऊस झाला. या पावसाने खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी सुरू असताना पावसाने जिल्ह्यात कहर केला. घटलेला जलस्तर वाढला आहे; मात्र पावसाने बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, कपाशी, फळबागा आदी पिकांचे फड उद्‌ध्वस्त केले. मागील आठवड्यापासून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होती. यासाठी महसूल, कृषी विभागाचे कर्मचारी तैनात केले गेले. आजअखेर जिल्ह्यातील चार लाख 28 हजार हेक्‍टरचे पंचनाम्यांचे काम झाले. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या पाच लाख 70 हजार आहे. 

नुकसान भरपाई द्यावी 

दोन्ही हंगामातील पिके हातची गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला उत्पन्नाचे कोणतेही साधन हाताशी राहिलेली नाही. त्यामुळे या पिकांच्या नुकसानीची भरपाई सरकारने तातडीने द्यावी,अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. 

सरकारकडे अहवाल पाठविणार 

शासन निर्देशानुसार बाधित क्षेत्राच्या पंचनाम्यांची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कृषी विभागातर्फे सविस्तर वर्गवारीनिहाय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याचा एकत्रित अहवाल प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठविला जाईल. 

- प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakh farmers hit in district