सांगलीत चाकूच्या धाकाने पाच जणांना लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

सांगली : पहाटेच्या सुमारास चाकू किंवा सुऱ्याचा धाक दाखवून लुटणारी टोळी दोन दिवसांपासून सक्रिय झाली आहे. आज पहाटे आंबेडकर रस्त्यावर दुचाकी अडवून चाकूच्या धाकाने सोनसाखळी व रोकड काढून घेतली. पेपर पार्सल टाकणाऱ्या दोघांनाही लुटले तर पोलिस निरीक्षकांच्या बंगल्याजवळ एका टेंपोचालकास मारहाण करून सोन्याचा बदाम व रोकड पळवली. दोन दिवसांपूर्वी बायपास रस्त्यावर दुधाचा रतीब घालणाऱ्यास लुबाडले होते, तर हार विक्रेत्याकडूनही सोन्याचा बदाम धमकावून काढून घेतला होता. शहर पोलिस ठाणे हद्दीतच हे प्रकार घडल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिस खाते नेमके करते आहे? असा सवाल उपस्थित करत आहेत.

भोसे (ता. मिरज) येथील बापूसाहेब नेमगोंडा पाटील (वय 59, सध्या रा. विनायक पार्क, टिटवाळा, जि. ठाणे) हे नातेवाइकाच्या लग्नकार्यासाठी आज पहाटे सव्वा चार वाजता सांगली रेल्वे स्थानकावर आले. त्यांना नेण्यासाठी त्यांचा नातेवाईक दुचाकीवरून आला. दुचाकीवरून दोघे आंबेडकर रस्त्याने हरिपूर रस्ता येथील काळीवाट परिसरात जाणार होते. मराठा समाजजवळ आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून थांबवले. दोघांनी उतरून चाकूचा धाक दाखवून पैसे, दागिने देण्यास सांगितले. पाटील यांनी 16 ग्रॅमची सोन्याची चेन आणि पाचशे रुपये काढून दिले. ते घेऊन चोरट्यांनी आंबेडकर रस्त्यावरून अंधारात पलायन केले.

तत्पूर्वी इचलकरंजीहून दुचाकीवरून पेपरचे पार्सल घेऊन आलेले विक्रेते शिवमूर्ती तुकाराम मोरे (वय 26) आणि अन्य एका विक्रेत्यास तिघा चोरट्यांनी कॉंग्रेस भुवनजवळील नेक्‍स्ट शोरूमजवळ पहाटे साडेतीन वाजता अडवून चाकूचा धाक दाखवून लुबाडले. एकाकडून 900 आणि एकाकडून 700 रुपये काढून घेतले. या प्रकारानंतर पोलिस निरीक्षकांच्या बंगल्याजवळील पेट्रोलपंपासमोर एका टेंपोचालकास लुटले. टेंपोचालक पहाटे केळी घेऊन विक्रीस आले होते. दोघा चोरट्यांनी त्याला गाठले आणि चाकूचा धाक दाखवून बाहेर ओढून धमकावले. त्याच्याकडील किरकोळ रोख रक्कम व एक सोन्याचा बदाम काढून घेतला. टेंपोचालकाने आरडाओरड केल्यानंतर जवळच्या वाल्मीकी-म्हेत्तर समाजातील काहीजण जागे झाले. ते चोरट्यांना पकडण्यासाठी धावले. तेवढ्यात दुचाकीवरून साथीदार तेथे आला. त्यानंतर दुचाकीवरून तिघे पसार झाले. दोन दिवसांपूर्वी बायपास रस्त्यावर कर्नाळ (ता. मिरज) येथील दूधवाल्यास चोरट्यांनी अडवून चाकू दाखवून 1500 रुपये पळवले. तसेच एक हारविक्रेत्यासही चाकूच्या धाकाने धमकावून गळ्यातील सोन्याचा बदाम हिसकावून घेतला. दोन दिवसात पाच ठिकाणी चोरट्यांनी चाकूच्या धाकाने लुटले आहे. प्रत्येक घटनेत तीन चोरटे होते.

दृष्टिक्षेपात
दोन दिवसांत पाच ठिकाणी लूटमार
तीन चोरट्यांकडून लूट
पहाटेच्या वेळी लुबाडणूक

पोलिस करतात काय?
पोलिस निरीक्षकांच्या बंगल्याच्या मागे पोलिस लाइनसमोर तीन दिवसांपूर्वी अंत्यविधीहून जाणाऱ्या दोघांना पहाटे तिघांनी अडवून सत्तूरने वार करून चारशे रुपये पळवले होते. त्यानंतर आज निरीक्षकांच्या बंगल्यासमोरच काही अंतरावर टेंपोचालकाला लुटले. पोलिसांची पहाटेची गस्त ढिली पडल्याचेच हे चित्र आहे. त्यामुळेच चोरट्यांचे फावले आहे.

पेपर, दूध विक्रेते भयभीत
दूध आणि पेपर विक्रेत्यांचा दिनक्रम पहाटे साडेतीन वाजल्यापासून सुरू होतो. दैनंदिन व्यवहारासाठी त्यांच्याकडे किमान हजार रुपये तरी असतातच; परंतु चोरट्यांनी त्यांना लुटण्याचा सपाटा लावल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी विक्रेते करत आहेत.

Web Title: five looted in sangli