दरोड्याच्या तयारीत पाचजण अटकेत; दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

सुनील गर्जे 
गुरुवार, 12 जुलै 2018

नेवासे पोलिसांनी छापा टाकून पकडले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, दरोड्याच्या साहित्यसह एकूण 10 लाख 10 हजार 940 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेवासे : नेवासे तालुक्यातील खडके फाटा ते सलाबतपुर रस्त्यावरील आडव्या पाटचारी जवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना नेवासे पोलिसांनी छापा टाकून पकडले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, दरोड्याच्या साहित्यसह एकूण 10 लाख 10 हजार 940 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींकडून अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी नेवासे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेवासाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहिती वरुन त्यांनी गुरुवार (ता. १२) ला पहाटे साडेतीन वाजता पोलिस पथकासह तालुक्यातील खडके फाटा-सलाबतपुर रस्त्यावरील आडव्या पाटचारी जवळ पहाणी केली असता तेथे इनोव्हा कार (एम.एच. ०५ बी.एस. ४७१६) दिसून आली. संशयीत हालचालीवरून कार जवळ असलेल्या सुजीत भिकन देवकुळे (वय २६) राहणार हरेगाव रोड, श्रीरामपूर, संदीप एकनाथ ढगे (वय २६) राहणार खोकर ता. श्रीरामपूर, रोहण विलास शिंदे (वय २५) राहणार पंचशील नगर, चाळीसगाव, जिल्हा जळगाव, अभिजीत मधुकर जोंधळे (वय २५) राहणार संगमनेर रोड, श्रीरामपूर, दीपक बाबासाहेब शेटे (वय २३) राहणार संजय नगर, श्रीरामपूर या पाच संशयितांना नेवासे पोलिसांनी छापा मारुन ताब्यात घेतले. त्यांची व गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडून रोख रक्कमेसह दरोड्याचे साहित्य असा १० लाख १० हजार ९४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Five people were arrested who had ready to Robbery