वीजबिलामागे पाच रुपये कमिशन!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

तक्रार निवारणार्थ महिन्याला वीजग्राहक दिन
दरम्यान, ग्राहकांच्या तक्रारींचे जलद गतीने निवारण होण्यासाठी व अधिकाऱ्यांचा त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी ‘महावितरण’ने मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून बारामती परिमंडलातील सर्व विभागीय कार्यालयांमध्ये प्रत्येक महिन्यात वीजग्राहक दिनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. दर महिन्याच्या चौथ्या मंगळवारी होणाऱ्या या उपक्रमाला २३ जुलैपासून सुरवात झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, वडूज, वाई व फलटण या विभाग कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या चौथ्या मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान वीजग्राहक दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सातारा - ‘महावितरण’च्या वॉलेटद्वारे वीजबिलांचा भरणा करून घेतल्यास प्रत्येक पावतीमागे पाच रुपये कमिशन देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम ‘महावितरण’ने सुरू केला आहे. त्यामुळे युवक व छोट्या व्यावसायिकांसाठी रोजगाराबरोबरच जादा उत्पन्नाची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील युवक व छोट्या व्यावसायिकांना त्यासाठी ‘महावितरण’कडे नोंदणी करावी लागणार आहे.

‘महावितरण’कडून तक्रार निवारणापासून सर्व प्रकराच्या सेवांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. त्यासाठी कंपनीने विविध ‘ॲप’ची निर्मितीही केली आहे. नुकतेच ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी वीजग्राहक दिन सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आता जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणच्या नागरिकांना आपले वीजबिल अधिक नजीकच्या ठिकाणी भरता यावे, यासाठी ‘महावितरण’ने वॉलेटचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच्या माध्यमातून वीज ग्राहकाला सुविधा उपलब्ध होण्याबरोबर युवकांना रोजगाराची संधी व छोट्या व्यावसायिकांना उत्पन्नवाढीचे साधन निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या वीजबिलांचा भरणा करण्यासाठी मोबाईल ‘ॲप’बरोबरच ऑनलाइन सेवा ‘महावितरण’ने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी वीजबिलांचा भरणा करून घेणारी केंद्रेही निर्माण केली आहेत. त्यामुळे वीज ग्राहकाला आपले बिल जवळच्या ठिकाणी विनाविलंब भरता येण्यास मदत होते. आता त्यापुढे जावून ग्राहकाला आणखी जवळ वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महावितरण’ने स्वतःचे पेमेंट वॉलेट आणले आहे. 

या वॉलेटद्वारे वीजग्राहकांना स्वतःचे वीजबिल भरता येईल. त्याचप्रमाणे बचत गट, जनरल स्टोअर्स, मेडिकल दुकानदार, किराणा दुकान आदी छोटे-मोठे व्यावसायिक, बचत गट, ‘महावितरण’चे वीजबिल वाटप व रिडींग घेणाऱ्या संस्थांना किंवा कोणत्याही युवकाला या ‘वॉलेट’द्वारे ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करून घेता येणार आहे. प्रत्येक बिलाच्या भरण्यापोटी ‘महावितरण’कडून संबंधित वॉलेट वापरणाऱ्याला पाच रुपये कमिशन दिले जाणार आहे. त्यातून संबंधिताला उत्पन्न मिळविता येणार आहे. त्यासाठी वॉलेटद्वारे वीजबिलाचा भरणा करण्याची इच्छा असलेल्यांना ‘महावितरण’कडे नोंदणी करावी लागणार आहे. वॉलेट नोंदणीसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. 

अर्ज केल्यानंतर संबंधित उपविभाग कार्यालयाकडून अर्जदारांच्या अर्जांची व जागेची पडताळणी करण्यात येईल. पाहणीनंतर त्याला वॉलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वॉलेटधारकाला सुरवातीला कमीतकमी पाच हजार रुपयांचे रिचार्ज करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर एक हजार रुपयांच्या पटीत रिचार्ज वाढविता येणार आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबॅंकिंगद्वारे रिचार्जची सोय उपलब्ध आहे. वॉलेट रिचार्ज केल्यानंतर वॉलेट ॲपद्वारे वीज ग्राहकांकडून वीजबिलांची वसुली करता येईल.

वीजबिलांचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठविण्याची सुविधाही यामध्ये आहे. त्याचबरोबर एका वॉलेटमधील शिल्लक रक्कम वापरून सबवॉलेटद्वारे एकापेक्षा अधिक व्यक्ती ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करता येणार आहे. या सुविधेसाठी शहरी व ग्रामीण भागातील इच्छुकांनी ‘महावितरण’च्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्जाद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Rupees Commission on Electricity Bill