पाच हजार "रेमडेसिव्हिर'नी दिले जीवदान!; कोरोना संकटांत वापर

अजित झळके
Saturday, 26 December 2020

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनने सांगली  जिल्ह्यातील शेकडो लोकांना जीवदान दिल्याचे आकडेवारीने समोर आले आहे.

सांगली ः कोरोनावर उपचारात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या वापराविषयी जगभरातील आरोग्य तज्ज्ञांचा अभ्यास सुरू आहे. काही मतभेदही आहेत; मात्र या इंजेक्‍शनने जिल्ह्यातील शेकडो लोकांना जीवदान दिल्याचे आकडेवारीने समोर आले आहे. जिल्ह्यात तब्बल पाच हजारांहून अधिक रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा वापर करण्यात आला. त्यांतील 3 हजार इंजेक्‍शन ही शासकीय कोट्यातून मोफत देण्यात आली, तर खासगी स्वरुपात सुमारे 2 हजार इंजेक्‍शनची विक्री झाली. सध्या या इंजेक्‍शनचा आवश्‍यक साठा वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध असून भविष्यातील संभाव्य साथीसाठी त्याच्या उपयुक्तता आणि परिणामकारकतेबाबत मात्र आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर छाती भरणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे अशी गंभीर लक्षणे होती. त्याला "छातीचा स्कोर', असे सामान्यांच्या भाषेत संबोधले जाते. हा "स्कोर' वाढला तर रेमडेसिव्हिर द्यावे लागते आणि ते कुठूनही उपलब्ध केलेच पाहिजे, अशी स्थिती होती. त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ झाली, ती त्रासदायक होती; मात्र त्याने रुग्णांना जीवदान दिले. किमान एक हजाराहून अधिक रुग्ण या इंजेक्‍शनचा कोर्स करून बचावल्याचे डॉक्‍टर सांगतात. जिल्ह्यात शासकीय कोट्यातून 3 हजार 67 इंजेक्‍शन्शची खरेदी झाली. जिल्हा परिषदेतील कोरोना नियंत्रण कक्षातून त्याचे नियंत्रण करण्यात आले. सर्व शासकीय रुग्णालयांत दाखल रुग्णांना ते मोफत देण्यात आले. काही खासगी रुग्णालयांनी "परत करण्याच्या अटीवर' ते इंजेक्‍शन नेले. अद्याप ती प्रक्रिया सुरू आहे. खासगी रुग्णालयांसाठी सुमारे 2 हजार इंजेक्‍शनचा वापर झाला. त्याची आधी किंमत सहा हजार रुपये होती. त्याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर काळाबाजार करण्यात आला. पुढे कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आणि दर 2400 रुपयांपर्यंत खाली आला आहे. 

भविष्यात कोरोनाचे नवे रूप अधिक गंभीर असल्याच्या जगभरातून बातम्या येत आहेत. या नव्या रुपासाठी रेमडेसिव्हिर उपयुक्त ठरेल किंवा नाही, याबाबतही चर्चा आता सुरू झाल्या आहेत. वैद्यकीय पंढरीत या इंजेक्‍शनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे; मात्र नवी लाट आपल्याकडे येऊच नये, हे अधिक परिणामकारक ठरेल, असा प्रयत्न करूया, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने केले आहे. 

"डब्ल्यूएचओ'पेक्षा शासन आदेश महत्त्वाचे 
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना उपचारात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या फायद्याबाबत संदिग्ध भूमिका घेतली आहे. त्याचा फारसा उपयोग होत नाही, अशा वक्तव्याने आरोग्य यंत्रणाही अचंबित आहे. वास्तविक, सध्या कोरोनावर उपचार घेत असलेल्या आणि फुफ्फुसामध्ये गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी त्याच इंजेक्‍शनचा वापर सुरू आहे. कारण आरोग्य संघटना काय म्हणजे यापेक्षा स्थानिक पातळीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या सूचना काय आहेत, हेच अधिक महत्त्वाचे आहे. सरकारने रेमडेसिव्हिरच्या वापरावर निर्बंध घातलेले नाहीत. 

परिणामकारकतेवर जगभर काम होतेय 
कोरोना हा विषाणू जगासाठी नवा आहे. त्यावर प्रचंड अभ्यास, संशोधन सुरू आहे. रेमडेसिव्हिरच्या परिणामकारकतेबाबतही अभ्यास सुरू आहे. कोरोनाचे संकट इतक्‍या वेगाने आले की, त्यासाठी उपयोगात आणल्या जात असलेल्या औषधांच्या परिणामकारकतेवर अभ्यासाला वेळ मिळाला नाही. रेमडेसिव्हिरचे जसे फायदे झाले, तसे काही साईड इफेक्‍ट होण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. ते कशा स्वरूपाचे आहेत किंवा असतील, यावर त्यातील तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत, असे डॉ. संजय साळुंखे यांनी स्पष्ट केले. 

अजूनही औषधाचा वापर सुरू

कोरोना संकट ही जागतिक आपत्ती होती. त्या काळात रेमडेसिव्हिरचा अँटी व्हायरल औषध म्हणून वापर केला गेला. त्याचा फायदाही झाला. अजूनही औषधाचा वापर सुरू आहे. कारण त्याबाबत शासनाकडून कोणत्याही निर्बंधांचे आदेश नाहीत. 
- डॉ. संजय साळुंखे, कोरोना नोडल ऑफिसर. 

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये
कोरोनाचे वेगवेगळे टप्पे करावे लागतील. त्यातील पहिल्या टप्प्यात रुग्णालयात आलेल्या रुग्णांना फक्त गोळ्या देऊन बरे करता आले. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये या विषाणूची तीव्रता वाढली होती. त्यांच्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन खूप उपयुक्त ठरले. त्यांच्या फुफ्फुसावर गंभीर परिणाम झाला होता. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. सप्टेंबरनंतर काही प्रमाणात परिणामकारकता कमी झालेली दिसली; मात्र ते पूर्ण निष्प्रभ ठरले नाही. भविष्यात ते उपयुक्त ठरेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. लोकांनी मात्र लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कारण, केवळ ताप हेही आता कोरोनाचे लक्षण आहे. 
- डॉ. अनिल मडके, श्‍वसन विकार तज्ज्ञ, सांगली. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand "remedivir 'gave life; used in Corona crisis