कुणीही या अन्‌ फ्लेक्‍स लावा! 

कुणीही या अन्‌ फ्लेक्‍स लावा! 

कऱ्हाड - अनधिकृत फ्लेक्‍सबाबत पालिकेच्या लवचिक धोरणामुळे "कुणीही यावे अन्‌ जागा मिळेल तिथ फ्लेक्‍स लावून जावे,'अशी स्थिती सध्या येथे झाली आहे. त्यामुळे लावण्यात येणाऱ्या फलकांवरील मजकूर, त्या फलकांची लांबी-रुंदी, लावण्याची जागा आदींचीही खातरजमा केली जात नसल्याचे यापूर्वीच्या प्रकारांवरून समोर आले आहे. 

कऱ्हाड शहरासह मलकापूर, सैदापूर, विद्यानगर, कृष्णा कॅनॉल, कार्वे नाका, कोल्हापूर नाका, पाटण तिकाटणे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेक्‍स लावले जातात. फ्लेक्‍स लावण्यासाठी संबंधित ठिकाणची पालिका, ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनेकदा परवानगी न घेताच अनेक ठिकाणी फ्लेक्‍स लावले जात असल्याचे दिसत आहे. जेथे चांगली जागा दिसेल तेथे फ्लेक्‍स लावण्याची संस्कृती शहरात सध्या वाढू लागली आहे. संबंधित फ्लेक्‍स जर विनापरवाना लावण्यात आला असेल, तर त्यावर कारवाई कऱण्याचा अधिकार हा पालिकेला आहे. मात्र, अनेकदा फ्लेक्‍स लावल्यानंतर पालिकेला माहिती होत असल्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. तर काही विनापरवाना फ्लेक्‍स काढण्याबाबत पालिकेकडून तातडीने कारवाई होत नसल्याचीही शहरात चर्चा सुरू आहे. अवैधरित्या फ्लेक्‍स लावण्यात येत असल्याने त्यावरील मजकूर काय आहे, त्याचा परिणाम काय होईल, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो का ? याचाही विचार होत नसल्याचेच दिसत आहे. त्यामुळे पालिकेने आता फ्लेक्‍सवरील मजकुराने एखादा नवीन वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याअगोदर पोलिसांच्या मदतीने अशा अवैधरित्या फ्लेक्‍सवर थेट कारवाईची धडक मोहीम राबवण्याची गरज आहे. 

पालिकेचे बुडतेय उत्पन्नही  
पालिकेला फ्लेक्‍सच्या माध्यमातून उत्पन्नाचेही साधन उपलब्ध असते. मात्र, अनेकदा ते अवैधरित्या विनापरवानाच लावण्यात येतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही पालिकेला मिळत नाही आणि वरून ते फ्लेक्‍स काढण्याचाही त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे बुडणारे उत्पन्न वाचवून फ्लेक्‍सबाबत शिस्त लावण्यासाठी पालिकेने आता कडक धोरण आवलंबण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com