फुलांच्या वर्षावाने आनंदले जवान!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

भावासारखे कायम पाठीशी उभे राहा!
राख्या बांधल्यानंतर जवान पाया पडताच, ‘‘महिलांनी तुम्हीच देवदूत आहात, आमच्या कशाला पाया पडता. तुम्ही आहात तर आम्ही निश्‍चिंत आहोत,’’ अशा भावनाही बोलून दाखवल्या. तुम्ही फार चांगले काम करत आहात. तुम्ही असेच भावासारखे कायम आमच्या पाठीशी उभे राहा, असा विनवणीचा सूरही महिलांनी जवानांच्या प्रती काढला.

कऱ्हाड - भारत माता की... म्हणताच उपस्थित प्रत्येकाच्या मुखातून जोशपूर्ण जय... असा आवाज बाहेर पडल्याने कृष्णा कॅनॉल परिसर दणाणून गेला. त्याला कारण होते महापुरात जिवाचे रान करून नागरिकांना जीवदान देणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांच्या स्वागताचे. त्यांना बांधण्यात आलेल्या राख्यांचे. सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त भागात लोकांना जीवदान देवून परतणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांचे येथे जोरदार स्वागत झाले. भारावलेल्या वातावरणात फुलांच्या वर्षावात औक्षण करून राखी बांधून झालेल्या या स्वागताने एनडीआरएफचे जवानही आनंदित झाले.

भाजपचे शहरप्रमुख एकनाथ बागडी यांनी जवानांच्या स्वागतासह राख्या बांधण्याचे नियोजन कृष्णा कॅनॉल येथे केले होते. सकाळी साडेआठपासून नागरिक येथे जमत होते. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार, एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, मलकापूरच्या नीलम येडगे, स्वाती पिसाळ, छाया पवार यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनीही येथे उपस्थिती लावली होती. त्यात पालिकेच्या आरोग्य विभागातील महिला कर्मचारी राख्या बांधण्यासाठी उपस्थित होत्या.

सव्वानऊच्या सुमारास एनडीआरएफच्या जवानांचे पथक येथे आले. त्यांचे वाहन थांबताच ‘भारत माता की, जय वंदे मातरम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected Help by jawan Rakhi Women