पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे ओघ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत निर्माण झालेल्या महापुराच्या संकटावर मात करण्यासाठी बाधित पूरग्रस्तांना पुन्हा नव्या उमेदीने उभे करणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने सकाळ रिलीफ फंडाने एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, त्यासाठी जिल्ह्यातील अनेक संस्थांसह वैयक्‍तिक पातळीवरही मदत स्वरूपात रोख रकमेचा ओघ सुरू झाला आहे.

वडूज/कऱ्हाड - सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत निर्माण झालेल्या महापुराच्या संकटावर मात करण्यासाठी बाधित पूरग्रस्तांना पुन्हा नव्या उमेदीने उभे करणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने सकाळ रिलीफ फंडाने एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, त्यासाठी जिल्ह्यातील अनेक संस्थांसह वैयक्‍तिक पातळीवरही मदत स्वरूपात रोख रकमेचा ओघ सुरू झाला आहे.

त्याअंतर्गत वडूज पंचक्रोशीतील मुस्लिम समाजबांधवांनी बकरी ईददिवशी विशेष उपक्रम राबवून, जमलेला २१,७८६ रुपयांचा निधी सकाळ रिलीफ फंडाकडे सुपूर्द केला. 

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत निर्माण झालेल्या विदारक पूरस्थितीचे बकरी ईदच्या सणावरही सावट जाणवत होते. त्यामुळे बकरी ईद साजरी करताना पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्याचा निर्णय वडूज येथील मुस्लिम समाजबांधवांनी घेतला. आज सकाळी ईदगाह मैदानात सामुदायिक नमाज पठण झाल्यावर मौलाना नूरमहंमद नूरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजानेही आपल्यापरीने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास उपस्थित मुस्लिम समाजबांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. पूरग्रस्तांसाठी केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत काही वेळातच २१,७८६ रुपयांची रक्कम जमा झाली.

यावेळी उपस्थित वडूज पंचक्रोशीतील सातेवाडी, पेडगाव, गोपूज, भुरकवडी, वाकेश्वर, दरूज, हिंगणे, तडवळे, मांडवे, गुरसाळे आदी गावांतील मुल्ला, मुलाणी, आतार, पठाण, शिकलगार, शेख, बागवान, काझी, पिंजारी, मनोरे, तांबोळी, इबुशे कुटुंबीयांनी या मदत कार्यात सहभाग घेतला. त्यानंतर मौलाना नूरमहंमद नूरी, वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक पाटील यांच्या हस्ते व समाजबांधवांच्या उपस्थितीत ‘सकाळ’चे तालुका प्रतिनिधी आयाज मुल्ला यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली.

दरम्यान, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सकाळ रिलीफ फंडाने केलेल्या आवाहनास कऱ्हाड शहर व तालुक्‍यातील मोठा प्रतिसाद मिळत आहे. पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा देण्यासाठी शहरासह तालुक्‍यातील अनेकांनी पुढाकार घेतला आहे. दिवसभरात सकाळ रिलीफ फंडाकडे सुमारे १२ हजारांची मदत येथील कार्यालयात जमा झाली. येथील बुधवार पेठेतील सतीश सुरेश कांबळे यांनी नऊ हजार ९९९ रुपयांची मदत सकाळ रिलीफ फंडात जमा केली. ते सेंट्रल बॅंकेत नोकरीस आहेत. सध्या ते शिरोळ तालुक्‍यातील पांचुब्री येथे असतात. त्याशिवाय विद्यानगर येथील सरस्वती विहार येथील सतीश शंकर भागवत व सौ. रेखा सतीश भागवत यांनी प्रत्येकी एक हजारांची मदत सकाळ रिलीफ फंडाकडे जमा केली आहे. 

याशिवाय सातारा कार्यालयात जमा झालेली रक्‍कम पुढीलप्रमाणे -
किशोर दत्तात्रय कुलकर्णी, गेंडामाळ, सातारा (१००० रुपये), उमाकांत कडू कोळी, करंजे, सातारा (२०००), सुशीला मधुकर साळुंखे, सातारा (१२००), बाळकृष्ण ज्ञानू निकम, मिलिटरी अपशिंगे (१०००), एकनाथ मारुती तांदळे, सातारा (१०००), शंकर विष्णू कोकीळ, सातारा (२०००), नंदू मारुती साठे, सातारा (१०००), चंद्रकांत जगन्नाथ भोसले, सातारा (२०००), संजीव मनोहर वाडीकर, सातारा (५०००), शालिनी नामदेव जाधव, सातारा (५०००), सुलक्षणा जगन्नाथ साबळे, सातारा (५०००), माधवी व श्रीनिवास महेश साबळे, सातारा (१८१), सप्तर्षी प्रतिष्ठान (२०००), बसवराज आप्पासाहेब कोरे, सातारा (१०००), सुरभी बसवराव कोरे, सातारा (१०००), अभिमन्यू अर्जुन पवार, उडतारे (१०००).

‘सकाळ’च्या विधायकतेचे कौतुक
अनेक आपत्तींच्या काळात सकाळ माध्यम समूह स्वत: पुढाकार घेऊन या आपद्‌ग्रस्तांच्या मदतीला धावून जातो. शिवाय समाज घटकांनाही मदतीसाठी आवाहन करतो. त्यास समाजातूनही चांगला पाठिंबा मिळतो. ‘सकाळ’ने नेहमीच पत्रकारितेबरोबर समाजविधायकता जोपासली आहे. त्यामुळे सकाळ रिलीफ फंडाकडे ही रक्कम सुपूर्द करीत ‘सकाळ’च्या विधायकतेचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected Help Sakal Relief Fund Muslim Society