हवाई मार्गांमुळे मदतीला वेग

निवास चौगले
रविवार, 11 ऑगस्ट 2019

साहित्याचे वजन करणे, त्याची वर्गवारी करणे, ज्या गावांत जे आवश्‍यक आहे, त्यानुसार त्याचे पॅकिंग करणे आणि आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये साहित्य भरून देणे अशी धांदल आज कोल्हापूर विमानतळावर बघायला मिळाली. शिरोळ तालुक्‍यातील पुराने वेढलेल्या गावांना जाणारे बहुंताशी मार्ग बंद आहेत, त्यामुळे वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमधूनच हे साहित्य आज पाठवण्यात आले.

कोल्हापूर - साहित्याचे वजन करणे, त्याची वर्गवारी करणे, ज्या गावांत जे आवश्‍यक आहे, त्यानुसार त्याचे पॅकिंग करणे आणि आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये साहित्य भरून देणे अशी धांदल आज कोल्हापूर विमानतळावर बघायला मिळाली. शिरोळ तालुक्‍यातील पुराने वेढलेल्या गावांना जाणारे बहुंताशी मार्ग बंद आहेत, त्यामुळे वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमधूनच हे साहित्य आज पाठवण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमल महाडिक काम करताना दिसत होते.

शिरोळ तालुक्‍यातील कुरुंदवाड, नृसिंहवाडी, आलास, बुबनाळ, खिद्रापूर, टाकळी, टाकळीवाडी, बस्तवडे, राजापूर अशा अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. या गावांतील लोकांना दत्त-शिरोळ कारखाना, गुरुदत्त शुगर्स-टाकळीवाडीसह काही शाळा व महाविद्यालयांच्या आवारात ठेवण्यात आले आहे. अशा दहा ते बारा ठिकाणी लोकांच्या छावण्या तयार करण्यात आल्या आहेत. या गावांतील घरे तर पाण्याखाली आहेतच; पण काही विकत घ्यावे तर दुकानेही पाण्याखाली आहेत. त्यामुळे टूथपेस्ट, ब्रश, वैद्यकीय साहित्य, सॅनिटरी नॅपकिन, लहान मुलांसाठी दूध, ब्रेड, बिस्कीट, फरसाण यांसारख्या खाद्यपदार्थांपासून ते जेवणाचे साहित्यही या लोकांना पाठवण्याची गरज होती. आज विमानतळावर गोळा झालेले असे साहित्य वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे शिरोळ तालुक्‍यात पोचवण्यात आले. हेलिकॉप्टरच्या किमान सहा खेपांतून सुमारे साडेआठ टन खाद्यपदार्थ पाठवण्यात आले.

आजारी मुलाला हेलिकॉप्टरने हलविले
पालकमंत्री पाटील कुरुंदवाड येथे गेले असताना या गावातील राजीव सक्‍सेना हा चार वर्षांचा मुलगा तापाने फणफणत असल्याचे लोकांनी सांगितले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक असल्याचे स्थानिक डॉक्‍टरांनी सांगितल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी स्वतः गेलेल्या हेलिकॉप्टरमधून विमानतळावर आणले. तेथून त्याला रुग्णवाहिकेतून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हवाईदलाच्या अधिकाऱ्यांना सलाम
सकाळी सात वाजल्यापासून वायुसेनेचे प्रमुख ए. श्रीधर, कोल्हापूरचे सुपुत्र संदीप पोवार, विंग कमांडर कृष्णन, महिला पायलट पारूल, एस. के. गुप्ता व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोहिमेत झोकून काम केले. आवश्‍यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवून, तर ज्या ठिकाणी हे शक्‍य नाही त्या ठिकाणी बकेटच्या साहाय्याने या बहाद्दर जवानांनी साहित्य पोचवले. त्यांना लष्कराच्या जवानांबरोबरच पोलिस दलाच्या जवानांनी मदत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected Kolhapur Airport