Video : कोल्हापूरच्या दूध उत्पादकांवर उपासमारीची वेळ

Kolhapur
Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूरजवळच्या चिखली गावच्या म्हसोबाच्या माळावर राहणारे जयसिंग पाटील शेतमजूर. घरच्या दावणीला चार दुभत्या गायी. त्यांच्या दूधविक्रीतून महिन्याला ५ ते ६ हजार रुपये मिळायचे. त्यावरच त्यांचा संसाराचा गाडा चालायचा. गेल्या आठवड्यात पंचगंगेच्या पुरानं या गायी वाहून नेल्या. जयसिंग पाटलांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आलीये.

असे अनेक जयसिंग पाटील चिखली, आंबेवाडी आणि पुराचा फटका बसलेल्या कोल्हापूरच्या गावागावांत आहेत. मुळात शेतीपेक्षा पूरक उद्योग असणारा दुधव्यवसाय शेतकऱ्यांना आधार देणारा. राज्याच्या दुधव्यवसायात कोल्हापूरचं नाव ठळक केलं ते जयसिंग पाटलांसारख्या छोट्या छोट्या दूधउत्पादकांनी. आज हे दूध उत्पादक पुराच्या तडाख्यानं कोलमडले आहेत. त्यामुळं कोल्हापूरच्या दुधाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. चिखली, आंबेवाडी परिसरातील ६१२ जणावरं या पुरात मृत्यूमुखी पडली तर, जवळपास ३०० गुरं गायब झाली.

चिखलीतील सहा दूध संकलन संस्था आहेत. त्यांचं दिवसभराचं तीन हजार लीटरचं दूध संकलन निम्म्याहून खाली आलं आहे. तर, गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात ५३ लाख लीटर दुधाचं संकलनच झालेलं नाही. दूध उत्पादकांना तब्बल २६ कोटींचा फटका बसला आहे. आता पूर ओसरल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या करुण कहाण्या समोर येऊ लागल्या आहेत.

सहा तारखेला पुरानं गावाला घेरलं. जयसिंग पाटलांच्या घरात, गोठ्यात पाणी शिरलं. त्यांनी दावणीची गुरं सोडली अन् जवळच्या म्हसोबाच्या मंदिरात नेऊन बांधली. निदान मंदिर तरी पाण्यात बुडणार नाही, या विश्वासानं त्यांनी शेजारच्या घराच्या वरच्या मजल्यावर रात्र काढली. सकाळी मंदिरात डोकावून पाहिलं तर सगळीच जनावरं वाहून गेलेली! स्वतःचा जीव वाचविण्यासाठी ते बचावपथकाच्या बोटीत बसून बाहेर पडले. 

आता पुन्हा गावात परतल्यानंतर रिकामा गोठा पाहून त्यांचे अश्रू थांबत नाहीत. त्यांचा जीव जगला पण, जगण्याचा आधारच हरपला आहे. चिखलीतच राहणाऱ्या बेबिता बोडकेंच्या शेतातल्या गोठ्यावरच्या पाच जनावरांपैकी दोन दुभती जनावरे वाहून गेली.

गोठाही कोसळला. 'आमची लक्ष्मीच वाहून गेली...' असं सांगताना त्या गहिवरल्या. 
आपल्यासोबत गुरांनाही वाचविण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला. बांधलेली जनावरं मोकळी केली. पण बेफाम पुरानं ती सोबत वाहून नेली. गुरांसोबत आमचा जगण्याचा आधारच वाहून गेला, अशी हताश भावना आंबेवाडी, चिखलीचे गावकरी व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com