Kolhapur Floods : पवारांनी 1989 मध्येच सांगितले होते चिखली गाव सोडायला...(व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

कोल्हापुरात १९८९, २००५ आणि २०१९ ला पंचगंगेला भीषण महापूर आले. कोल्हापूर शहरापासून ७ किलोमीटरवर वसलेल्या चिखलीपासून पंचगंगा सुरू होते. कुंभी, कासारी, भोगावती आणि तुळशी अशा चार नद्या त्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी संगम पावतात. परिणामी, चिखलीला दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावाच लागतो. 

कोल्हापूर : महापुरात उद्ध्वस्त झालेल्या प्रयाग चिखलीतील एका ग्रामस्थाचा व्हिडिओ कोल्हापुरात व्हायरल होत आहे. १९८९ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी चिखली ग्रामस्थांना दरवर्षीच्या पुराच्या संकटापासून कायमच्या सुटकेसाठी ९० एकर पर्यायी जमिनीची व्यवस्था केली होती, अशी आठवण या व्हिडिओतून ग्रामस्थाने सांगितली आहे.

कोल्हापुरात १९८९, २००५ आणि २०१९ ला पंचगंगेला भीषण महापूर आले. कोल्हापूर शहरापासून ७ किलोमीटरवर वसलेल्या चिखलीपासून पंचगंगा सुरू होते. कुंभी, कासारी, भोगावती आणि तुळशी अशा चार नद्या त्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी संगम पावतात. परिणामी, चिखलीला दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावाच लागतो. 

यंदाच्या महापुरातही चिखलीला मोठा फटका बसला. गावातील शेती, घरे, जनावरांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर चिखलीतील ग्रामस्थाने पहिल्या महापुरातच पवारांनी गाव सोडायला सांगितले होते, अशी आठवण मांडली आहे. 

'पवार इथे आले होते तेव्हा. शाहू महाराजांची ९० एकर जमीन आम्हाला दिली. गाव सोडायला सांगितले. पंधरा हजार रुपयांची मदतही तेव्हा दिली होती. आम्हीच गाव सोडले नाही. चुक आमची झाली...,' असे या ग्रामस्थाने व्हिडिओत म्हटले आहे. 

व्हिडिओमध्ये विद्यमान सरकारवरही संबंधित ग्रामस्थाने टीका केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood affected on Prayag Chikhli village in Kolhapur