कोल्हापुरात यंदाच्या महापुराने बदलले सीमारेषेचे संदर्भ

कोल्हापुरात यंदाच्या महापुराने बदलले सीमारेषेचे संदर्भ

कोल्हापूर - पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर आले. गायकवाड वाडा, जामदार क्‍लबजवळ जाऊन पोहोचले म्हणजे बऱ्यापैकी पूर आला, अशी परिस्थितीची ओळख होती. पाणी पुढे पंचगंगा तालमीजवळ आले, की पूर वाढत असल्याचे संकेत मानले जात होते. यावेळेपर्यंत पाणी दोन्ही बाजूला गल्लीबोळाच्या तोंडापर्यंत येऊन पोहोचलेले असायचे.

पंचगंगा आपल्या गल्लीपर्यंत आली म्हणून गल्लीतल्या बायका, पोरी, केळ, लिंबू, भाताची मुद, अगरबत्ती, कापूर घेऊन पाण्याचे श्रद्धेने पूजन करायच्या. पंचगंगेबद्दल कृतज्ञताच त्या निमित्ताने व्यक्त करायच्या. तेथून पुढे पुराचे पाणी आहे त्याच स्थितीत खेळत राहायचे आणि रात्रीत कधीतरी उतरायचे. यानिमित्ताने जामदार क्‍लब, पंचगंगा तालीम, गुणे बोळ, परीट गल्ली, मस्कुती तलाव, धर्मशाळा, ज्ञानेश्‍वर प्रिंटिंग प्रेसवाल्या सहस्रबुद्धेंचा वाडा ही नावे पूर पाहायला येणाऱ्या लोकांच्या तोंडात यायची. ही नावे म्हणजे पंचगंगेच्या पुराच्या पातळीची परिमाणेच असायची. 

आता यंदाच्या महापुराने जनवाडकरांचा कॉर्नर हे नवे परिमाण तयार केले आहे, पण या पूर्वीचे सारे टप्पे ओलांडून पंचगंगेचा पूर डॉ. जनवाडकरांच्या घराच्या अलीकडे येऊन थांबला. २००५ साली आलेल्या पुराच्या सीमेपुढे जनवाडकरांचे घर शंभर ते १५० फूट आहे. काही स्थानिक संदर्भ काळाच्या ओघात कसे बदलत जातात. याचे हे उदाहरण आहे. पंचगंगा नदीचे पात्र तसे पाहिले तर शहराच्या अगदी लगत आहे. पात्रापासून काही अंतर पुराचे पाणी पुढे आले, की गायकवाड वाड्याच्या पायरीला लागते. या वाड्यात माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे बंधू राहायचे. 

आता माजी आमदार (कै.) संजयसिंह गायकवाड, संग्रामसिंह गायकवाड यांचे कुटुंबिय या वाड्यात राहतात. या वाड्यात पाळीव बिबट्या होता. या बिबट्याने तिघा शाळकरी मुलावर व एका पोस्टमनवर हल्ला केल्याने हा बिबट्या तेथून हलवला. 
या गायकवाड वाड्यानंतर पुराचे पाणी येऊन भिडायचे ते जामदार क्‍लबला. हा जामदार क्‍लब म्हणजे २४ तास पत्याची पिसणी अशी आताची ओळख. पण खरी ओळख अशी की, गणपतराव भोसले व श्रीपतराव साळुंखे उर्फ तात्या जमादारांनी इथे १९१० साली एक फुटबॉल क्‍लब स्थापन केला. तो खूप गाजला.

अर्थात पुढे या क्‍लबचा फुटबॉल थांबवला व पत्त्याच्या खेळ चालू झाला. या जामदार क्‍लबजवळ पुराचे पाणी आले की, तो पुराचा पुढचा टप्पा म्हणून ओळखला जातो. त्यापुढे पूर पंचगंगा तालीम आणि दिलखूश बेकरीजवळ आला की, आता पुर वाढला असा संकेत दिला जातो. आजवरचा इतिहास पाहता १९८९ आणि २००५ चा महापुर वगळता पूर दिलखूश बेकरीच्या पुढे फारसा गेला नाही. २००५ चा पुर मात्र पंचगंगा रुग्णालयाजवळ मारुतीच्या देवळापर्यंत पोहोचला. पंचगंगेच्या इतिहासतला सर्वात मोठा पूर म्हणून इथे एका फरशीवर तसा मजकूर महापालिकेने कोरला आहे. 

२०१९ च्या महापुराच्या सीमारेषेचा फलक लावणार
या वेळी जास्तीत जास्त पाणी तिथपर्यंत येईल, असे वाटले होते. पाणी तिथपर्यंत आले आणि पुराने २००५ च्या पुराची सीमारेषा गाठली, असे संदेश त्या रात्री फिरू लागले; पण सकाळी तर पुराचे पाणी त्याही पुढे गेले व डॉ. जनवाडकर घराच्या अलीकडे काही अंतरावर येऊन थांबले. आता त्या ठिकाणी पंचगंगेच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या पुराच्या सीमारेषा २०१९ असा फलक लावला जाणार आहे. महापुराच्या सीमारेषेचे संदर्भ कसे बदलतात, याचा तो पुरावा ठरणार आहे. पंचगंगेच्या पुराचे पाणी शहराच्या दिशेने प्रवेश करताना गायकवाड वाडा, जामदार क्‍लब, सहस्त्रबुद्धेंचा वाडा, भोपेराव कदमांचा वाडा, गोडबोलेंचा वाडा, गुणे वाडा, धर्मशाळा यांच्या आठवणींना पुन्हा ओले करत पुढे पुढे जाते आणि पाऊस किती मिलिमीटर झाला. यापेक्षा या संदर्भावर पुराच्या पाण्याची स्थिती शहरवासीयांना कळत जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com