तपासणीशिवाय पूल खुले करणे धोक्‍याचे

हेमंत पवार
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

आठवणही ताजी....
कऱ्हाड-विटा राज्य मार्गावरील जुना कृष्णा पूल वाहून जाण्याअगोदर आठवड्यापूर्वीच तो पोलिस आणि प्रशासनाने वाहतुकीस बंद केला होता. आठवड्यातच त्या पुलाचा काही भाग वाहून गेला. त्या पुलावरून वाहतूक सुरू असती तर किती जणांना जिवास मुकावे लागले असते, हे सांगणे अवघड आहे. या पुलाची आठवण ताजी असल्याने बांधकाम विभागाने संबंधित पाण्याखाली गेलेल्या पुलांसंदर्भात योग्य ती काळजी घेणे आवश्‍यक आहे.

कऱ्हाड - कऱ्हाड, पाटण तालुक्‍याला महापुराचा मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक पूल काही दिवस पाण्याखाली राहून त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. पूरस्थिती ओसरली असल्याने पाण्याखाली गेलेले पूल मोकळे होवू लागले आहेत. मात्र, त्यातील अनेक पूल वापरण्यायोग्य राहिलेले नसल्याचे चित्र दिसत आहे. बांधकाम विभागाच्या विशेष विभागाने फक्त रेठरे बुद्रुक पूलच बंद केला आहे. मात्र, तांबवे, मोरगिरी, नेरळे, कोयनानगर, तारळे विभागातील अनेक पूल पाण्याखाली जावून त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातील अनेक पूल उद्‌ध्वस्त होवूनही ते पूल बंद करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे ‘स्टक्‍चरल ऑडिट’ न झाल्यास अनेकांचे जीव टांगणीला लागणार आहेत. 

मुसळधार पावसाने कोयना धरण झपाट्याने भरले. केवळ दहाच दिवसांत कोयना धरण पाणलोटक्षेत्रात सहा दशकांचे सर्व ‘रेकॉर्ड’ मोडणारा पाऊस झाला. त्यात नवजा परिसरात पाच हजार ८९५ मिलिमीटर पाऊस झाला.

त्यातच कोयना धरणातून तब्बल ५५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यातच पावसाची मुसळधार सुरूच होती. त्यामुळे कोयना-कृष्णा नद्यांचे पाणी पात्राबाहेर येऊन दोन्ही तालुक्‍यात महापूर आला. त्यामुळे अनेक घरांत पाणी घुसले, अनेक रस्ते, पूल पाण्याखाली जावून जनजीवन विस्कळित झाले.

त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती. तीन दिवसांपासून कऱ्हाड- पाटण तालुक्‍यातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यातच पावसाने उघडीप दिल्याने कोयना धरणातील विसर्गही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी पूर्ववत होऊन अनेक पूल पाण्याबाहेर आले आहेत.

मात्र, कऱ्हाड-पाटण तालुक्‍यांतील तांबवे, नेरळे, संगमनगर, तारळे विभागातील अनेक पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. आजच तांबवे पूल पाण्याबाहेर आल्यावर तो तर उद्‌ध्वस्तच झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे असे अनेक पूल वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत, असे दिसत आहे.

बांधकाम विभागाच्या विशेष विभागाने कऱ्हाड तालुक्‍यातील फक्त रेठरे बुद्रुक पूलच बंद केला आहे. मात्र, तांबवे, मोरगिरी, नेरळे, कोयनानगर, तारळे विभागातील अनेक पूल पाण्याखाली जावून त्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचीही बांधकाम विभागाने दखल घेऊन त्यांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाल्याशिवाय ते पूल वाहतुकीस खुले करणे धोक्‍याचे होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Bridge Open Checking Dangerous