गडहिंग्लज तालुक्यात तीन बंधारे पाण्याखाली; हिरण्यकेशी पात्राबाहेर

अजित माद्याळे
रविवार, 7 जुलै 2019

गडहिंग्लज - तालुक्‍यात आणि आंबोली परिसरात काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर पडली आहे. परिणामी या नदीवरील ऐनापूर, निलजी, नांगनूर बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद झाली आहे. 

गडहिंग्लज - तालुक्‍यात आणि आंबोली परिसरात काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर पडली आहे. परिणामी या नदीवरील ऐनापूर, निलजी, नांगनूर बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद झाली आहे. 

आंबोली परिसरातील मुसळधार पावसाने हिरण्यकेशी नदीतील पाण्याची पातळी वाढून नदी पात्राबाहेर पडली आहे. ऐनापूर बंधाऱ्यावरून कोवाडे, सरोळी, निंगुडगे, पेद्रेवाडी, हाजगोळीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.  आजरा मार्गे पर्यायी वाहतूक सुरू झाली आहे.

याशिवाय निलजी बंधाऱ्यावरील पाण्यामुळे नूल, बसर्गे, येणेचवंडी, खणदाळ, हलकर्णीकडे जाणारी वाहतूक पर्यायी जरळी बंधारा आणि भडगाव पूलावरून सुरू आहे. बंधाऱ्यावरील पाण्यातूनही धोकादायक स्थितीत खासगी वाहतूक सुरू राहत असल्याने पोलिसांनी बॅरेकेटींग लावले आहे. तरीसुद्धा मोटरसायकल वाहतुकीसह तरूणाईची सेल्फीसाठी होणारी गर्दी सुरूच होती. आंबोली, आजरा परिसरातील मुसळधार पाऊस असाच कायम राहिल्यास जरळीसह इतर बंधारे आणि भडगाव पूलावर पाणी येण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. 

चित्री प्रकल्प 30 टक्‍क्‍यावर 
गडहिंग्लज तालुक्‍याला वरदायिनी ठरणाऱ्या चित्री मध्यम प्रकल्पात 570 एमसीएफटी पाणीसाठा झाला असून त्याची टक्केवारी 30 टक्के इतकी आहे. आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासात धरणक्षेत्रात 115 मि.मि. पावसाची नोंद झाली असून आजअखेर 959 मि.मि. पाऊस झाल्याचे पाटबंधारेचे उपअभियंता सुहास नाडकर्णी यांनी सांगितले. 

 तालुक्‍यात 19 मि.मि.ची नोंद 
आज सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासात तालुक्‍यात सरासरी 19.34 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. गडहिंग्लज मंडलमध्ये 26, दुंडगे 17, महागाव 32, कडगाव 14, नेसरी 24, नूल 8, हलकर्णी मंडलमध्ये 13 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्‍यात कुठेही पावसाने पडझड नसल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flood to Hiranyakeshi river in Gadhinglaj Taluka