महापुरात राबणाऱ्यांची केली अनोखी सेवा

कोल्हापूर - महापुरात बचावकार्य करणाऱ्या जवानांचे पाय स्वच्छ करून त्यांना औषधे लावताना दाम्पत्य.
कोल्हापूर - महापुरात बचावकार्य करणाऱ्या जवानांचे पाय स्वच्छ करून त्यांना औषधे लावताना दाम्पत्य.

कोल्हापूर - महापुराची व्याप्ती एवढी होती, की मदतीसाठी लष्कराला पाचारण करावे लागले होते. 

लष्करच काय, अनेकजण आपापल्या परिने मदतीसाठी झटत होते. या आठ जणांनाही काहीतरी करायचे होते, पण महापुरात उतरून कोणालाही वाचवण्याची त्यांची ताकद नव्हती. त्यांना पोहायलाही येत नव्हते. त्यामुळे पाण्यात अडकलेल्यांसाठी सुरू असलेले मदतकार्य पहात ते पाण्याच्या काठावरच उभे रहात होते, हे पहात असतानाच त्यांना जाणवत होते, की बचाव कार्य करणारे सलग आठ दहा तास पाण्यात आहेत आणि पाण्यात उभे राहून राहून त्यांच्या पायाच्या बोटात खाज सुटू लागली आहे. जीवावर उदार होऊन काम करणारी ही मंडळी बोटाच्या त्रासाने मात्र वैतागली आहेत. मग यांनी ठरवले. आपण या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्यांच्या पायाची सेवा करायची. 

नुसते ठरवून ते थांबले नाहीत. त्यांनी डेटॉल, कापूस, ॲन्टीसेफ्टीक क्रिम आदी साहित्य आणले. पुरातून बोट बाहेर आले, की ते बोटीतील पोलीस, जवान, कार्यकर्त्यांचे पाय डेटॉलने स्वच्छ धुवू लागले. त्यावर ॲन्टीसेफ्टिक क्रिम लावू लागले. 

नदीच्या काठावर त्यांनी छोटे सेवाकेंद्रच उघडले. काम तसे छोटेसे, पण पाण्यात काम करणाऱ्या सर्वांच्या दृष्टीने ते काम मोलाचे ठरले.

मदत करायचीच म्हटले तर आपण आपल्या ताकदीने काय करू शकतो. याचेही महापुराच्या काळातले अनोखे उदाहरण त्यांनी वास्तवात उतरवले. 
अतुल घाटगे, एस्तर घाटगे, सिकंदर सोनुले, रेश्‍मा सोनुले, हेमंत कवाळे, दिपाली कवाळे, प्रभाकर लोखंडे, मिनाक्षी लोखंडे या चार मध्यमवर्गीय जोडप्यांच्या सेवाभावी वृत्तीची ही कहाणी आहे. पुराची भिषणता पाहून ते हबकले होते. त्यांची घरे सुरक्षीत होती, पण त्यांना इतरांसाठी काही तरी करायचे होते. पूरग्रस्तांसाठी पदरचे लाख, दोन लाख खर्चही करू शकत नव्हते. पण ते स्वस्थ बसणारे नव्हते. 

पुराच्या काळात पाण्यात उभे राहून अनेकांनी मदत कार्य केले. काही जण पुरात उतरून मदत कार्य करत होते. काही जण लोकांची सुटका करत होते. काही लोकांना बोटीतून सुरक्षीतस्थळी हलवत होते. या आठ जणांना मात्र हे करणे शक्‍यच नव्हते. त्यामुळे त्यांनी पुरात मदत करणाऱ्यांना आपल्यापरीने मदत करायची ठरवली. त्यांना जाणवले, की पाण्यात आठ दहा तास असणाऱ्या या मंडळींच्या पायाला खाज सुटली आहे. बोटांच्या बेचक्‍यात कातडी कुरतडली गेली आहे. त्याचा मोठा त्रास या सर्वांना होत आहे. त्यांनी लगेच डेडॉल, कापूस, ॲन्टीसेफ्टिक क्रिम आणले. व आपले काम सुरू केले. 

पाण्यातून बोट बाहेर आले की ते त्यातील लोकांचे पाय झडपट पुसू लागले. आपला गारठलेला पाय कोणीतरी हातात घेऊन पुसतो आहे. पायाला औषध लावतो आहे. हे सर्वांना अनपेक्षीपत होते. अनेकजण त्यांच्या हातात पाय द्यायला अवघडू लागले. पण त्यांनी प्रत्येकाला विनंती केली. लष्कर, एन.डी.आर.एफचे जवान व पोलीसही या आगळ्या वेगळ्या सेवेने क्षणभर बावरले. ‘भैय्या, दिदी अपना पैर तुम्हारे हातमे कैसे देने का’ असे म्हणत तेही सेवा नम्रपणे नाकारू लागले. पण आठ जणांनी त्यांना विनंती केली. व प्रत्येकाच्या पायाला डॅटॉल, औषधाची क्रिम लावण्याची सेवा त्यांनी सलग पाच दिवस केली. किमान सहाशे, सातशे जणांचे पाय त्यांनी या निमित्ताने आपल्या हातात घेतले. वरवर हे काम दिसायला खूप छोटे,पण महापुराच्या काळात त्यांच्या सेवेचे मुल्य अमुल्य होते. निर्वाज्य सेवा म्हणजे काय असते, याचे ते प्रतिकच ठरले. 

महापुराच्या काळात आम्ही जी सेवा दिली, ती तुलनेत छोटी आहे. पण सलग आठ दहा तास पाय पाण्यात राहिला, की तळवे, पायाची बोटे मऊ पडतात. कुजल्यासारखी होतात. तेथे खाज सुटते जखम होते. त्याचा त्रास खूप होतो. आम्ही पुरात उतरू शकलो नव्हतो. कारण ते काम आम्हाला जमलेच नसते. म्हणून आम्ही पुरात उतरलेल्यांचा पायाची सेवा केली. 
- अतुल घाटगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com