नगररचना विभागामुळेच आला कोल्हापुरात महापूर

नगररचना विभागामुळेच आला कोल्हापुरात महापूर

कोल्हापूर - महापालिकेतील २५ अधिकारी आणि २८ बांधकाम व्यावसायिकांमुळे पंचगंगेला महापूर आला. या महापुराचा नगररचना विभागाने आणलेला महापूर असे नामकरण करा, असा उपरोधिक टोला नागरी कृती समितीने लगावला. महापुरानंतर उद्‌भवलेली स्थिती, रेडझोनमधील बांधकामे यासंबंधी आयुक्तांशी समितीच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पूररेषा निश्‍चित करावी, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. 

शिष्टमंडळाने सायंकाळी महापालिकेत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी तसेच ‘नगररचना’चे सहायक संचालक प्रसाद गायकवाड यांची भेट घेतली. लोकांचे जीव धोक्‍यात आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, पूररेषा योग्य नसल्याचे पत्र यंदा जससंपदा विभागाने दिले, पत्र येऊनही पुन्हा २१ बांधकामांना नव्याने परवानगी दिली गेली, असे परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशीही मागणी या वेळी झाली. ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, की महापूर नैसगिक नाही, तर नगररचना विभागाचा (टी. पी.) हा महापूर आहे. २५ अधिकारी आणि २८ बांधकाम व्यावसायिकांमुळे महापुराचे संकट उभे राहिले.

या ५३ लोकांनी पाच लाख लोकांचा जीव धोक्‍यात आणला. २००५ ते २०१९ पर्यंत जलसंपदा विभागाची पूररेषेसंबंधी जी पत्रे आली, ती जनतेसाठी खुली करावीत. धक्कादायक बाब अशी ः २०१९ मध्ये पूररेषेसंबंधी जलसंपदा विभागाचे पत्र आले. या पत्रानंतरही बांधकामांना बंदी असलेल्या परिसरात २१ बांधकामांना नव्याने परवानगी दिली गेली. अशा प्रकारे परवानगी देऊन लोकांचे जीव धोक्‍यात आणणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा, शहरात आयुक्तांनी स्वच्छता मोहीम राबविली आहे तशीच मोहीम अधिकाऱ्यांबाबत राबवा, रेडलाईनसाठी आपण हरकती मागविल्या, शासनाला प्रस्ताव दिला; पण त्यास मान्यता मिळालेली नाही. पुराच्या पाण्याची गती आणि प्रवाह पाहता काळवट जमिनीत जी बांधकामे झाली आहेत, ती मुंबई व ठाण्यातील बांधकामांसारखी कोसळणार तर नाहीत ना? 

माजी नगरसेवक दिलीप शेटे म्हणाले, की आमच्या काळातही वेळोवेळी पूरासंबंधी सूचना केल्या. त्याकडे दुर्लक्ष झालेच त्यातून काही अधिकारी अभियंते मोठे झाले. मोकळ्या जमिनींवर डोळा ठेवायचा आणि बांधकाम व्यावसायिकांना कागदपत्रे पुरविण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले. अशोक पोवार यांनी महापुराचे संकट नैसर्गिक नव्हे, तर मानवनिर्मित असून, ३० सप्टेंबरपर्यंत पूररेषा निश्‍चित करा अन्यथा आम्ही जनआंदोलन उभारू.

आयुक्तांनी पूररेषेतील बांधकाम परवाने पूर्वीच थांबविले असून, नव्या पूररेषेसाठी लवकरात लवकर कार्यवाहीचे आश्‍वासन दिले.
शिष्टमंडळात लाला गायकवाड, संभाजीराव जगदाळे, दिलीप पवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, महेश लोखंडे, नाना जाधव, रणजित आयरेकर, विनोद डुणूंग, किरण पडवळ, अशोक रामचंदानी, माजी नगरसेवक विजय साळोखे-सरदार, सतेज भोसले, श्रीकांत भोसले, महेश जाधव, महादेव जाधव, ॲड. पंडितराव सडोलीकर, चंद्रमोहन पाटील, सुनील पाटील, विकास गायकवाड यांचा समावेश होता.

रेडझोनमघ्ये बांधकामे झाली, ती तत्काळ पाडून टाका. चुका करणाऱ्यांवर कधी तरी कारवाई करा, आम्हाला थातूरमातूर उत्तर नको. 
- ॲड. बाबा इंदूलकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com