कोल्हापूर जिल्ह्यात 72 रस्ते, 250 गावांत पाणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील 72 रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर 200 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याने शेकडो लोक आडकून पडली असल्याची भिती व्यक्‍त होत आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील 72 रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर 200 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याने शेकडो लोक आडकून पडली असल्याची भिती व्यक्‍त होत आहे. जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाकडून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. चिखली व शिरोळ तालुक्‍यातील परिस्थिती कठीण बनली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून सर्वच नद्यांना महापूर आला आहे. या महापुराचे पाणी नदीकाठच्या गावांत आणि शहरांमध्ये घुसले आहे. मदतीसाठी यंत्रणा जरी देण्यात येत असली तरी आपत्तीत सापडलेल्या लोकांची संख्या अधिक असल्याने ही यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. कार्यकर्ते आणि तरुण मंडळे मदतीसाठी धावू लागली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यावर पाणी आल्याने मदतकार्य पोहोचवण्यात अडचण येत आहे. 

पुरामुळे बहुतांश तालुक्‍यातील रस्त्यांना फटका बसला आहे. शाहूवाडीत 7, करवीरमध्ये 8, शिरोळ 11, हातकणंगले 7, कागल 5, गडहिंग्लज 1, चंदगड 8, पन्हाळा 9, भुदरगड 5, राधानगरी 3, आजरा 5, गगनबावडा 3 रस्ते पुराने बाधित झाले आहेत. यात इतर जिल्हा मार्गाच्या 7 रस्त्यावरील वाहतूक खंडीत आहे. 30 रस्त्यांवरची वाहतूक अंशत: खंडित आहे. 5 ग्रामीण मार्गावरील वाहतूक पुर्णत बंद आहे. तर 30 गावांना पर्यायी मार्गाने पोहोचण्याची व्यवस्था केली आहे. 

नदी काठ धास्तावला 
जिल्ह्यातील 250 पेक्षा अधिक गावात पुराने थैमान घातले आहेत. पंचगंगा, वारणा नदी काठच्या गावांमध्ये भयावह स्थिती आहे. आरोग्य विभागाने आरोग्य पथकांची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील पुराचा फटका बसत नसलेल्या भागातील डॉक्‍टरांना शिरोळ, करवीर तालुक्‍यात पाचारण केले आहे. आरोग्य यंत्रणांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood situation in Kolhapur