पूरग्रस्तांना 20 हजार लाडू अन् महिलांसाठी 5 हजार साड्यांची मदत

अभय जोशी 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

- सांगली जिल्ह्यामधील पूरग्रस्त गरजू महिलांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती च्या वतीने श्री रुक्मिणी मातेला अर्पण झालेल्या 5 हजार साड्या आज पाठवण्यात आल्या.

- काल दहा हजार बुंदीचे लाडूही पाठवण्यात आले.

पंढरपूर : सांगली जिल्ह्यामधील पूरग्रस्त गरजू महिलांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती च्या वतीने श्री रुक्मिणी मातेला अर्पण झालेल्या 5 हजार साड्या आज पाठवण्यात आल्या. काल दहा हजार बुंदीचे लाडूही पाठवण्यात आले. पंढरपूर येथील सुमारे 5 हजार पूरग्रस्तांना दोन्ही वेळचे जेवण पुरवण्याची भूमिका पार पाडून मंदिर समितीने मोठा दिलासा दिला आहे. तसच सांगली येथील पूरग्रस्तांना  वाटप करण्यासाठी काल 20 हजार बुंदीचे लाडू  सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोच करण्‍यात आले.

पंढरपूर येथील प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले हे कार्यक्षम आणि संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. पंढरपूर येथे पूरपरिस्थिती निर्माण होताच त्यांनी मंदिर समितीच्या परवानगीने पूरग्रस्तांना दोन्ही वेळचे जेवण पुरवण्याचा निर्णय घेऊन स्थानिक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यवाही केली.

एवढ्यावरच न थांबता श्री रुक्मिणी मातेला अर्पण करण्यात आलेल्या 5 हजार साड्या देखील सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्याचा निर्णय समितीचे  अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सह अध्यक्ष  गहिनीनाथ महाराज औसेकर, इतर सर्व सदस्य यांनी घेतला. आज 5 हजार पैकी चार हजार साड्या सांगली येथे रवाना करण्यात आल्या. उर्वरित एक हजार साड्या पुढील दोन-तीन दिवसात सांगलीला पाठविण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood survivours get help of eatables and sarees